Spread the love

लोणीसिम येथील देवीच्या चांदीच्या मूर्ती चोरीप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्याबाहेर उपोषण

ग्रामस्थांची चोरट्यांचा शोध घेऊन अटकेची मागणी; पोलिसांकडून सखोल तपासाचे आश्वासन

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणीसिम येथील ‘श्री कोकण माता’ देवी मंदिरातील चांदीच्या मूर्ती चोरीप्रकरणी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, या मागणीसाठी लोणीसिम येथील महिला व पुरुष ग्रामस्थांनी पारोळा पोलिस ठाण्याच्या आवारात उपोषण सुरू केले.

या उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार उल्हास देवरे तसेच पारोळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची भेट घेऊन मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेची सखोल चौकशी करून संशयितांचा शोध घेण्याची मागणी केली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास करून संशयितांचा शोध घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे तसेच लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

उपोषणस्थळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक पराग मोरे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार तसेच पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोराज पाटील यांची उपस्थिती होती.

दरम्यान, मंदिरातील चांदीच्या मूर्ती चोरीच्या या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पोलिसांकडून संशयितांना कधी ताब्यात घेतले जाते, याकडे लोणीसिम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version