Spread the love

घरफोडी करणाऱ्या कुख्यात भादा टोळीचा पर्दाफाश; १२ गुन्हे उघडकीस

मुख्य सूत्रधारासह सात जण ताब्यात; पिस्तुल, मॅग्झीन, जिवंत काडतुसे व १८.७८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

धुळे प्रतिनिधी : धुळे ग्रामीण भागात बंद घरांचे कुलूप व कडी-कोयंडे तोडून घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कारवाईदरम्यान पिस्तुल, मॅग्झीन, जिवंत काडतुसे, कटर तसेच सुमारे १८ लाख ७८ हजार ९९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

नेर येथील घरफोडीनंतर तपासाला वेग

तालुक्यातील नेर येथील रहिवासी व सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल आनंदा सूर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पिस्तुल, १२ राऊंड, रोख रक्कम तसेच सोन्याची वीट व अंगठी चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळवून फत्तेसिंग मिलनसिंग भादा, रा. दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्याची अंगझडती घेतली असता कट्यार, पिस्तुल, मॅग्झीन आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांच्या मदतीने केलेल्या घरफोड्यांची तसेच चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी केलेल्या व्यवहारांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टोळीतील संशयितांची नावे तपासात समोर

पोलिसांच्या तपासात मुख्य सूत्रधार फत्तेसिंग मिलनसिंग भादा याच्यासह चॅम्पीयनसिंग मिलनसिंग भादा, त्याचा अल्पवयीन भाऊ, मनजितसिंग जनरलसिंग सरदार, सुरेश बबन लोंढे (२३), किरण रामदास राखपसरे (३०) तसेच किरण बन्सीलाल देवरे (५८) यांची नावे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यापैकी सुरेश लोंढे हा चोरीचा माल विक्रीसाठी मदत करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. किरण रामदास राखपसरे हा पाचोरा येथील रहिवासी असून सध्या धुळे येथे राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पाचोरा येथील सराफ व्यावसायिक किरण बन्सीलाल देवरे याच्याकडून चोरीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोरीचा माल असल्याची माहिती असूनही दागिने कोणत्याही पावती अथवा बिलाशिवाय खरेदी केल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.

१८ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिकाकडून १७ लाख ६ हजार ६१० रुपये किमतीचे १०४.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ७२ हजार ३८० रुपये किमतीचे ८५.६ भार वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत १८ लाख ७८ हजार ९९० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

२०२५ मधील १२ घरफोडीचे गुन्हे उघड

या टोळीच्या चौकशीत धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०२५ मधील तब्बल १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. नवलंबे, आमदड, तरवाडे, मोराणे, कुंडाणे, मिनाई कॉलनी, पांडवनगर-नेर, विचूर, अंजन, वरखेडी आदी भागांत या घरफोड्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हद्दपारीनंतरही गुन्हेगारी सुरू असल्याचा पोलिसांचा दावा

मुख्य संशयित फत्तेसिंग मिलनसिंग भादा याच्याविरुद्ध मोहाडी तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, फत्तेसिंग भादा, त्याचा भाऊ चॅम्पीयनसिंग आणि आई बरसातकौर यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार ११ ऑगस्ट २०२५ पासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या कारवाईमुळे धुळे ग्रामीण भागातील घरफोडीच्या मालिकेतील अनेक गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली असून, टोळीशी संबंधित आणखी काही बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धोके, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग मोरे, तसेच अमित माळी, धनंजय मोरे, शाम निकम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version