Spread the love

हवालदाराच्या नावे २० हजारांची लाच मागणाऱ्या खासगी इसमास अटक

अटकेची भीती दाखवत लाचेची मागणी; जळगाव एसीबीच्या कारवाईने भुसावळात खळबळ

जळगाव : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक होण्याची भीती दाखवून, अटक टाळण्यासाठी पोलीस हवालदाराच्या नावे २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. अमन हसबिंदर सनसोये असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.

एसीबीच्या पडताळणीत अमन सनसोये याने पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्या नावे तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.

अटकेची भीती दाखवून पैशांची मागणी

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदारासह अन्य तीन जण अशा चौघांना अटक होण्याची भीती दाखवण्यात आली होती. या भीतीपोटी चौघांनी प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख रुपयांपैकी ५० हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर तडजोडीअंती खासगी इसम अमन सनसोये याने पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्या नावे तक्रारदाराकडे आणखी २० हजार रुपयांची लाच मागितली. तसेच ही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले.

या प्रकरणी एसीबीने कारवाई करत अमन सनसोये याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

एसीबीच्या पथकाची कारवाई

ही कारवाई डीवायएसपी तथा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर आणि सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आणि राकेश दुसाने यांनी सहभाग घेतला.

लाचेची मागणी झाल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन

जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

एसीबी संपर्क :
☎️ लँडलाईन : ०२५७-२२३५४७७
📱 व्हॉट्सॲप : ७५८८६६१०६४

Share.
Leave A Reply

Exit mobile version