Spread the love

जळगावात जैन समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव व महाप्रसादाचे आयोजन

४ ऑक्टोबरला ब्राह्मणसभा मंगल कार्यालयात कार्यक्रम; पर्युषण महापर्वानिमित्त सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, धीरज सैतवाल (प्रतिनिधी) : श्री दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळ आणि दिगंबर जैन महिला मंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पर्युषण महापर्वानिमित्त महाप्रसाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.

प.पू. श्री १०८ तरुण सागर महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प.पू. श्री १०८ आस्तिकय सागरजी व विनियोग सागर महाराजजी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ब्राह्मणसभा मंगल कार्यालय, बळीराम पेठ येथे हा सोहळा पार पडणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे तसेच समाजातील इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘भावना अच्छी हो तो, कार्य भी अच्छे होते हैं!’ या प्रेरणादायी संदेशासह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्युषण महापर्वानिमित्त महाप्रसाद

गुणगौरव सोहळ्यानंतर पर्युषण महापर्वानिमित्त दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळ व दिगंबर जैन महिला मंडळ, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची वेळ व स्थळ

  • दिनांक : रविवार, ४ ऑक्टोबर २०२६

  • गुणगौरव सोहळा : सकाळी १० वाजता

  • महाप्रसाद : दुपारी १२ ते २

  • स्थळ : ब्राह्मणसभा मंगल कार्यालय, बळीराम पेठ, जळगाव

Share.
Leave A Reply

Exit mobile version