Spread the love

वरखेडचे सुपुत्र इंजि. सचिन तायडे यांचा ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने’ गौरव

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता गौरव सोहळ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान; सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित ‘अभियंता गौरव समारंभ-२०२६’ मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील सुपुत्र तथा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२५-२६ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये इंजि. सचिन तायडे यांचा समावेश आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (रस्ते) शरद ना. राजभोज, सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे, सचिव (म.रा.पा.सु.वि.म. मुंबई) गिरीश जोशी, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश भ. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पा. निगोट, सचिव राष्ट्रीय महामार्ग विभाग संतोष शेलार, सचिव प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता एकनाथ तळेले, जितेंद्र काळे, उपअभियंता प्रवीण पुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तांत्रिक कामासोबत नागरिकांशी थेट संवाद

इंजि. सचिन तायडे हे अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील अधिकारी म्हणून परिचित असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत नियोजन, तांत्रिक निकष आणि कामाचा दर्जा यांचा समन्वय साधण्यावर त्यांनी भर दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून घेणे आणि उपलब्ध प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात येते.

ग्रामीण विकासातील कामाची दखल

तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार काम, नागरिकांच्या गरजा आणि ग्रामीण विकास यांचा समन्वय साधत केलेल्या कामाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. अभियंता संवर्गातील अधिकारी म्हणून काम करताना विकासकामांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गौरव सोहळ्यास राज्यातील विविध भागांतून अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. इंजि. सचिन तायडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभियंता सहकारी, मित्रपरिवार, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच मलकापूर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

तायडे परिवाराची उपस्थिती

पुरस्कार स्वीकारताना इंजि. सचिन तायडे यांचे वडील तथा माजी सरपंच निवृत्ती तायडे, आई सौ. संगीता तायडे, पत्नी इंजि. सौ. कोमल सचिन तायडे तसेच त्यांच्या दोन्ही मुली सांचल व क्रांतीज्योती उपस्थित होत्या.

वरखेडच्या सुपुत्राला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेला हा सन्मान तायडे परिवारासाठी तसेच मलकापूर तालुक्यासाठी गौरवाचा क्षण ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version