Spread the love

‘विकसित भारत २०४७’ विषयावर सारोळा शाळेत चित्रकला स्पर्धा

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उत्कृष्ट बालकलाकारांचा गौरव

अहिल्यानगर प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा, केंद्र राजुरी, ता. जामखेड येथे मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘विकसित भारत २०४७’ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध कल्पना आणि रंगांच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना चित्रांमध्ये साकारत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमासाठी सारोळा गावचे माजी सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अजयदादा काशिद यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शालेय जीवनातील कलेचे महत्त्व, चित्रकलेतील स्वतःचे अनुभव तसेच दुष्काळासारख्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी भारताच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी चित्रांतून मांडली विकसित भारताची संकल्पना

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विकसित भारत, पर्यावरण, तंत्रज्ञान, शिक्षण, स्वच्छता, सामाजिक विकास आदी विविध संकल्पना चित्रांच्या माध्यमातून मांडल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या कलाकृतीमागील आशय जाणून घेतला.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आर्या उमेश भोगे हिने ‘विकसित भारत’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

उत्कृष्ट चित्रकला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

अजयदादा काशिद यांचा विशेष सन्मान

श्रीराम, भोलेनाथ आणि संत मीराबाई यांच्या कलाकृती स्वतः साकारल्याबद्दल अजयदादा काशिद यांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

कला हे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि सामाजिक जाणिवांना आकार देणारे प्रभावी माध्यम आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, तसेच सामाजिक विषयांकडे सर्जनशील दृष्टीने पाहण्याची संधी मिळते.

शिक्षक, पालक व ग्रामस्थांची उपस्थिती

कार्यक्रमास ग्रामसेवक निलेश टेकाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग, पालक सदस्य योगेश मुळे, किरण काळे, निलेश थोरात, माजी विद्यार्थिनी शिवकन्या मनोज सातपुते, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे, राहुल लिमकर, उपाध्यापक प्रशांत होळकर, उपाध्यापिका शबाना शेख, वृषाली खांदवे, अमृता रसाळ यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version