तिनसमाळ येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला उदंड प्रतिसाद
७० आदिवासी महिलांची नोंदणी; शासकीय योजना, कृषी अनुदान व प्रशिक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी उपक्रम ठरला उपयुक्त
धडगाव प्रतिनिधी :
महिलांना शेती क्षेत्रात ‘शेतकरी’ म्हणून स्वतंत्र व अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने तिनसमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जय जोहार फाऊंडेशन आणि जोहार आदिवासी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात परिसरातील ७० आदिवासी महिलांनी नोंदणी केली.
ग्रामीण व आदिवासी भागातील शेती व्यवस्थेत महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, अनेक महिलांकडे शेतकरी म्हणून अधिकृत कागदपत्रे नसल्याने विविध शासकीय योजना, कृषी अनुदान, प्रशिक्षण आणि इतर सुविधांचा लाभ घेताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन महिलांना आवश्यक प्रमाणपत्रासाठी नोंदणीची सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यात आली.
ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
दुर्गम भागातील महिलांना ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, तसेच अर्जासाठी तालुका किंवा इतर ठिकाणी जाण्याचा वेळ आणि प्रवास खर्च वाचावा, या उद्देशाने हे शिबिर थेट गावात आयोजित करण्यात आले.
शिबिरादरम्यान जोहार आदिवासी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा पावरा यांनी महिलांचे ऑनलाइन अर्ज भरून देत आवश्यक मार्गदर्शन केले. जय जोहार फाऊंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण पावरा यांनी तांत्रिक सहकार्य केले. तसेच कल्पना पावरा आणि दीपक पावरा यांनी शिबिराच्या आयोजनासाठी मोलाची साथ दिली.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांमध्ये आपल्या हक्कांविषयी तसेच शासकीय योजनांबाबत वाढत असलेली जागृती सकारात्मक असल्याचे आयोजकांनी सांगितले. महिलांना शासकीय सुविधा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
