Spread the love

नगरसचिव मनोज वाघ यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

रोजंदारी कर्मचारी ते नगरसचिव आणि उपायुक्त पदापर्यंतचा ३८ वर्षांचा प्रवास; मनपा सेवेत पुन्हा ‘एन्ट्री’चे आयुक्तांचे संकेत

धुळे : प्रतिनिधी

रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेला सुरुवात करून नगरसचिव आणि उपायुक्त पदापर्यंतचा तब्बल ३८ वर्षांचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करणारे धुळे महानगरपालिकेचे नगरसचिव मनोज वाघ हे ३० सप्टेंबर रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, मनोज वाघ यांनी पुन्हा महानगरपालिकेच्या सेवेत यावे, अशी मागणी यावेळी अनेक मान्यवरांनी केली. या मागणीला आयुक्त नितीन कापडणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाघ यांच्या मनपातील पुनरागमनाचे संकेत दिले.

सलग सुमारे चार तास चाललेल्या या सेवापूर्ती सोहळ्यात मनोज वाघ यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील विविध प्रसंग, कार्यपद्धती, समयसूचकता आणि प्रशासकीय अनुभवाचा मान्यवरांनी उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातूनही उपस्थितांसमोर मांडण्यात आला.

रोजंदारी कर्मचारी ते उपायुक्त पदापर्यंतचा प्रवास

१९८८ मध्ये धुळे महानगरपालिकेच्या सेवेत मनोज वाघ यांच्या सेवाकाळाला सुरुवात झाली. रोजंदारी कर्मचारी म्हणून सुरू झालेला हा प्रवास पुढे विविध जबाबदाऱ्या सांभाळत नगरसचिव आणि त्यानंतर उपायुक्त पदापर्यंत पोहोचला.

प्रशासकीय कामकाजातील अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जाताना त्यांनी विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय मार्गदर्शन केले. सहकाऱ्यांशी तसेच नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी हसतमुखपणे संवाद साधत काम करण्याच्या त्यांच्या शैलीचा अनेक मान्यवरांनी गौरव केला.

प्रथम महापौरांपासून विद्यमान महापौरांपर्यंत तसेच विविध माजी व विद्यमान नगरसेवक आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

‘मनपा सेवेत पुन्हा या’ अशी मान्यवरांची मागणी

सेवापूर्ती सोहळ्यात अनेक मान्यवरांनी मनोज वाघ यांचा अनुभव महानगरपालिकेला भविष्यातही उपयोगी पडावा, अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी पुन्हा मनपाच्या सेवेत यावे, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीला आयुक्त नितीन कापडणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वाघ यांच्या महानगरपालिकेतील पुनरागमनाबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या अनुभवाचा भविष्यात मनपाला उपयोग करून घेण्याबाबत आयुक्तांनी संकेत दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘पदातून मुक्त झालो; संबंधांतून आणि ऋणातून कधीच नाही’

सत्काराला उत्तर देताना मनोज वाघ यांनी उपस्थित मान्यवर, सहकारी आणि हितचिंतकांचे आभार मानले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“पदातून मुक्त झालो आहे; मात्र संबंधांतून आणि ऋणातून कधीही मुक्त होणार नाही,” या भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी जुने गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

सेवापूर्ती सोहळ्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पुखराज बोहरा, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर भगवान करण काळ, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, कल्पना महाले, जयश्री अहिरराव, ज्येष्ठ नेते विनायक शिंदे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मनोज वाघ यांनी शासकीय सेवेतून निरोप घेतला असला, तरी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा महानगरपालिकेला पुन्हा उपयोग होणार का, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version