Spread the love

महावितरण जळगाव विभागातर्फे सेवा संकल्प अभियानांतर्गत सौरऊर्जा जनजागृती

‘प्रधानमंत्री सूर्यघर’ व ‘SMART सोलर’ योजनेची ग्राहकांना माहिती; रूफटॉप सोलरसाठी कर्ज सुविधांबाबतही मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी :
महावितरण जळगाव विभागातर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सौरऊर्जा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (SMART) सोलर योजना याबाबत सविस्तर माहिती देऊन घरगुती पातळीवर सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

या अभियानादरम्यान ग्राहकांना रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्पाची कार्यपद्धती, सौरऊर्जेचे फायदे, घराच्या छतावर सोलर यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजबिलात बचत करण्यासह पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

रूफटॉप सोलरसाठी कर्ज सुविधांची माहिती

या उपक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेचे शाखा व्यवस्थापक दीपक कुमार व चंदन कुमार उपस्थित होते. त्यांनी ग्राहकांना रूफटॉप सोलर प्रकल्पासाठी उपलब्ध कर्ज सुविधा, कर्ज घेण्याची प्रक्रिया, आवश्यक बाबी तसेच आर्थिक नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री. साळी, उपकार्यकारी अभियंता श्री. मराठे, सहाय्यक अभियंता श्री. तडवी, प्रनोती पाटील, माधुरी पाटील तसेच श्री. सपकाळे यांनी ग्राहकांना विविध सौरऊर्जा योजनांची माहिती देत त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

महावितरण जळगाव विभागाच्या या जनजागृती उपक्रमाला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version