भागपूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
‘निपुण महाराष्ट्र’, SQAAF मूल्यांकन, पाठ नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन
नशिराबाद, दि. ३० सप्टेंबर २०२६ :
जिल्हा परिषद शाळा, भागपूर येथे नशिराबाद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अजित तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. विजय पवार आणि मा. श्री. जितेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. राहुल संसारे होते. केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा खारे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला केंद्रप्रमुख राहुल संसारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भागपूर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘स्वागतम् सुस्वागतम्, हा मानाचा मुजरा’ या गीतावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन
परिषदेत ‘निपुण महाराष्ट्र अभियान : शाळानिहाय प्रगतीचा आढावा’, ‘SQAAF विश्लेषण’ आणि ‘शाळेत करावयाच्या अनुषंगाने आनापान’ या विषयांवर केंद्रप्रमुख राहुल संसारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
‘SQAAF मूल्यांकन उंचावण्याबाबत विचारांची देवाणघेवाण’ या विषयावर श्री. लोटन पवार आणि श्री. अविनाश पाटील यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. ‘पाठाचे नियोजन व मासिक नियोजन’ या विषयावर श्रीमती मंजू बारी यांनी शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेत मार्गदर्शन केले.
‘त्रैमासिक पालक सभा’ या विषयावर श्रीमती कविता पाटील आणि श्रीमती वंदना बागुल यांनी मार्गदर्शन केले. तर ‘वीरगाथा उपक्रम व समग्र प्रगतिपत्रक’ याबाबत श्रीमती जयश्री पगारे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
तुषार सोनवणे यांचा सत्कार
नशिराबाद केंद्रातील जि.प. शाळा, तिघ्रे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. तुषार सोनवणे यांची विभागीय परीक्षेद्वारे अंजाळे केंद्र, ता. यावल येथे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल केंद्राच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन
शिक्षण परिषदेच्या निमित्ताने केंद्रप्रमुख राहुल संसारे यांच्या संकल्पनेतून ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे प्रतीक’ म्हणून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम रांगोळीच्या माध्यमातून एकत्रितपणे साकारण्यात आले. या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
परिषदेचे सूत्रसंचालन श्री. अनिलकुमार महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रकाश सोनवणे यांनी केले. सुंदर फलक लेखन श्री. निलेश सपकाळे यांनी केले. शिक्षण परिषदेची व्हिडिओ निर्मिती श्री. विजय निकम यांनी केली.
पहिल्यांदाच भागपूर शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन
जि.प. शाळा, भागपूर येथे प्रथमच केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषद यशस्वी करण्यासाठी भागपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश सोनवणे आणि उपशिक्षक श्री. निलेश सपकाळे यांनी विशेष प्रयत्न केले.
अध्यक्षांच्या परवानगीने ‘वंदे मातरम्’ या गीताने शिक्षण परिषदेची सांगता झाली.
