इंदिरा गांधी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात
सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव : येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सुरेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी हे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत, असे आवाहन केले. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमास उपप्राचार्य ए. एस. पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील आणि पर्यवेक्षिका भारती पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रूपाली पाटील व ज्योती चौधरी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक डी. एन. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
