नशिराबादला एसटी कंट्रोल रूमच नाही; विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय
नवीन बसस्थानकाजवळ कायमस्वरूपी कंट्रोल रूम उभारण्याची नागरिकांची मागणी; बायपासवरून जाणाऱ्या बसेसच्या नोंदीबाबतही प्रश्न
नशिराबाद प्रतिनिधी :
नशिराबाद : शहरातील एसटी बससेवेच्या नियोजनासाठी असलेली कंट्रोल रूम सध्या योग्य ठिकाणी उपलब्ध नसल्याने शाळकरी विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. नशिराबाद येथे नवीन बसस्थानक उभारण्यात आले असताना त्याच्या परिसरातच एसटीची स्वतंत्र व कायमस्वरूपी कंट्रोल रूम उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नशिराबादच्या जुन्या बसस्थानकावरील एसटी कंट्रोल रूमची इमारत जीर्ण होऊन तुटल्यानंतर काही काळ लगतची जागा भाडेतत्त्वावर घेऊन कंट्रोल रूमचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, आता ही भाड्याची जागाही खाली करण्यात आली आहे. परिणामी सध्या नशिराबाद नगरपरिषदेच्या पाण्याच्या मुख्य टाकीखालील एका केबिनमध्ये एसटी कंट्रोलरसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र, ही जागा नवीन बसस्थानकापासून वेगळ्या ठिकाणी असल्याने प्रवाशांना कंट्रोलर नेमके कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बसच्या वेळा, मार्ग, फेऱ्या, विद्यार्थ्यांचे पास तसेच बससेवेशी संबंधित अन्य अडचणींसाठी चौकशी करताना विद्यार्थी व नागरिकांची धावपळ होत आहे.
बायपासवरून जाणाऱ्या बसेसच्या नोंदीबाबत प्रश्न
नशिराबाद बायपासवरून ये-जा करणाऱ्या एसटी बसेसच्या नोंदी आणि बसस्थानकातील त्यांच्या फेऱ्यांबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही एसटी बसेस नशिराबाद बसस्थानकात न येता बायपासमार्गे पुढे जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. काही चालक पुलाचा वापर करून बसस्थानकाला वळसा घालत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, बस न आल्याने पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बायपासवरून जाणाऱ्या बसेसची योग्य नोंद, फेऱ्यांचे नियोजन आणि बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूमची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवीन बसस्थानकाजवळच व्यवस्था करण्याची मागणी
नशिराबादमध्ये नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या बाजूलाच एसटी महामंडळाने स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कंट्रोल रूम उभारल्यास प्रवाशांना बससेवेची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच बसच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण ठेवणे, फेऱ्यांच्या नोंदी ठेवणे आणि बससेवेशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे सुलभ होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या नगरपरिषदेने पाण्याच्या टाकीखाली एसटी कंट्रोलसाठी तात्पुरती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही व्यवस्था प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची नसल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी नवीन बसस्थानकाच्या परिसरातच कायमस्वरूपी कंट्रोल रूम उभारावी, अशी मागणी नागरिक, विद्यार्थी आणि नशिराबादवासीयांकडून करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन बसस्थानक परिसरात कंट्रोल रूमची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच बायपासमार्गे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांबाबत स्पष्ट नियोजन करावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
