Spread the love

शिक्षणसेवकांच्या मानधनात प्रतिमाह २० हजारांची वाढ करा

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांसाठी अनुक्रमे ३६, ३८ आणि ४० हजार रुपये मानधनाची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील सध्या कार्यरत असलेल्या शिक्षणसेवकांच्या मानधनात प्रतिमाह २० हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करून सुधारित मानधन लागू करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. शिक्षकभारती संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आणि समर्थ संघटनेचे मुंजा गिरी यांनी याबाबत महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.

सुधारित मानधनाची मागणी

निवेदनानुसार, शिक्षणसेवकांच्या सध्याच्या मानधनात प्रतिमाह २० हजार रुपयांची वाढ करून पुढीलप्रमाणे सुधारित मानधन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • प्राथमिक/उच्च प्राथमिक शिक्षणसेवक — ३६ हजार रुपये प्रतिमाह

  • माध्यमिक शिक्षणसेवक — ३८ हजार रुपये प्रतिमाह

  • उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवक — ४० हजार रुपये प्रतिमाह

यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करून मानधनवाढीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा वाढता भार

शिक्षणसेवकांकडून अध्यापनाच्या मुख्य जबाबदारीसोबत परीक्षा, मूल्यमापन, निकाल प्रक्रिया, विविध शासकीय उपक्रम, विद्यार्थी व पालक मार्गदर्शन, शालेय नोंदी, सर्वेक्षणे, शैक्षणिक अहवाल, प्रवेश प्रक्रिया तसेच विविध शैक्षणिक अभियानांची अंमलबजावणी अशी विविध कामे केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, वाढती महागाई, घरभाडे, प्रवासखर्च, अन्नधान्य, वैद्यकीय खर्च, वीजबिल, शिक्षण आणि कौटुंबिक गरजा यामुळे आर्थिक भार वाढला असून, त्या तुलनेत सध्याचे मानधन अपुरे ठरत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

मानधनाचा नियमित आढावा घेण्याची मागणी

२२ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील भूमिकेनुसार मानधनाचा किमान चार वर्षांतून एकदा आढावा घेण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्यानंतरच्या काळात महागाई व जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन मानधनाचे पुनरावलोकन करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

“विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षणसेवकांचे वर्तमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आवश्यक आहे. शिक्षणसेवकांच्या कामाचे स्वरूप, वाढत्या जबाबदाऱ्या, महागाई आणि मानधनाच्या पुनरावलोकनाच्या भूमिकेचा विचार करून मानधनवाढीचा निर्णय तातडीने घेण्यात यावा,” अशी भूमिका शिक्षकभारती संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी व्यक्त केली.

राज्यातील शिक्षणसेवकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी व मागण्यांवर शासनस्तरावर चर्चा करावी तसेच प्रतिमाह २० हजार रुपयांची अतिरिक्त मानधनवाढ मंजूर करून ३६, ३८ आणि ४० हजार रुपयांचे सुधारित मानधन लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version