Spread the love

स्वच्छता ही सेवा व सेवा संकल्प अभियानातून पारोळ्यात विशेष स्वच्छता अभियान

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त नवीन भाजीपाला मार्केट, मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल व बाजारपेठ परिसरात स्वच्छता मोहीम

पारोळा (प्रतिनिधी : संदीप पाटील) : ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पारोळा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नवीन भाजीपाला मार्केट, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल तसेच बाजारपेठ परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानास लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, आरोग्य सभापती डॉ. मंगेशआण्णा तांबे, शिवसेना गटनेते अमृतभाऊ चौधरी, भाजपा गटनेते धीरजभाऊ महाजन यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड

यावेळी नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील यांनी महात्मा गांधी यांनी स्वच्छतेकडे केवळ आरोग्याचा विषय म्हणून न पाहता निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार समाजासाठी ती मूलभूत गरज मानली असल्याचे सांगितले. गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत नगरपरिषदेच्या माध्यमातून बाजारपेठ परिसरात स्वच्छता व कचरा संकलनाची मोहीम राबविण्यात आली.

उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे यांनी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच बाजारपेठ परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत व्यापारी व नागरिकांना मार्गदर्शन केले.

‘स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी’

आरोग्य सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी, “स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश दिला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा, स्वच्छ व सुंदर पारोळा तसेच लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

नगरसेवकांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

अभियानात नगरसेवक मनीषकुमार भाईदास पाटील, दीपकभाऊ अनुष्ठान, बापूसाहेब रमेश मिस्तरी, नितीनभाऊ सोनार, राजेंद्र हिम्मत पाटील, प्रमोदशेठ कासार, अमोलदादा गोविंद शिरोळे, नरेंद्रभाऊ राजपूत, पंकजभाऊ राजेंद्र मराठे, विवेकभाऊ पतंगराव पाटील, भूषणभाऊ टिपरे, नजीर खान हमीद खान, राजेंद्र मोतीलाल कासार, गोपालशेठ मुरलीधरसा दाणेज, संदेश अशोक शिरोडे, सुदामबापू चौधरी, मनोजभाऊ जगदाळे, छोटू हिरामण पाटील, इमरान शेख सलीम, विनोद पाटील, दगडू पवार सर यांच्यासह अन्य नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाले.

तसेच स्थापत्य अभियंता सुमित पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, स्वीय सहाय्यक तथा सभा लिपिक किशोर चौधरी, भूषण महाजन यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले.

अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी, सिद्धार्थ इंगळे, शुभम कंखरे, मोतीलाल बळीराम पाटील, विश्वास पाटील, निर्भय मोरे, सतीश चौधरी, कैलास वानखेडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘स्वच्छ पारोळा, सुंदर पारोळा, निरोगी पारोळा, विकसित पारोळा’ या संकल्पनेतून स्वच्छतेचा संदेश देत हा विशेष स्वच्छता उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version