धुळे अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
शिवसेना जिल्हाप्रमुख सतीष महाले यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; निष्पक्ष तपास, पीडितेचा इन-कॅमेरा जबाब व जलद न्यायाची मागणी
धुळे प्रतिनिधी : धुळे शहरातील महिलेवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीष तात्या महाले यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अटक केलेल्या आरोपींविरुद्ध लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच पीडितेचा इन-कॅमेरा जबाब नोंदवून प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने होऊन पीडितेला लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. तसेच तपासात आरोपींना कोणत्याही व्यक्तीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर धुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबर रोजी धुळे शहर बंदचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेच्या निवेदनात पीडितेला न्याय मिळणे ही प्रशासनाची तसेच समाजाची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपास कोणत्याही दबाव किंवा हस्तक्षेपाशिवाय करून दोषींवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख सतीष तात्या महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, महिला जिल्हाध्यक्ष हेमा हेमाडे, नगरसेविका मंगला सोनवणे, सिद्धार्थ करणकाळ, किरण आगलावे, प्रतीक शिंदे, सचिन मोरे, प्रफुल सोनवणे, दिनेश चव्हाण, विष्णू जावडेकर, प्रतिभा सोनवणे, सुरेखा रोकडे, गायत्री लंगडे, संध्या कांदोडे, कुणाल सूर्यवंशी, सोनाली सोनवणे, शुभम जगदाळे, अजय जगदाळे, केतन भारती, साहिल छत्रे, योगेश वाणी, प्रतीक बोपे, मयूर सोनार, देवेंद्र गायकवाड, बॉबी गायकवाड, सुनील वाल्हे, चेतन भामरे, संदीप पाटील, सागर पाटील, मुकेश अमृतकर, मनोज कोळी, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.
