नाशिक कवीच्या अध्यक्षपदी सुभाष सबनीस; कोषाध्यक्षपदी अजिंक्य मगर
कवितेला व्यासपीठ, नवोदितांना संधी देणाऱ्या संस्थेच्या कार्यकारिणीची एकमताने निवड
नाशिक जिल्हा प्रतिनिधी : नवनाथ पाटील गायकर
नाशिकच्या साहित्यविश्वात कवितेला व्यासपीठ, नवोदित कवींना संधी आणि साहित्यप्रेमींना सातत्याने सृजनशील उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या ‘नाशिक कवी’ या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, प्रकाशक व संपादक सुभाष सबनीस, तर कोषाध्यक्षपदी इंजि. अजिंक्य मगर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदांबाबत निर्णय घेण्यासाठी नाशिक कवीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुभाष सबनीस यांची अध्यक्षपदी, तर इंजि. अजिंक्य मगर यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेचे कार्यवाह तथा कवी नंदकिशोर ठोंबरे यांनी ही माहिती दिली.
नाशिकच्या साहित्यविश्वात ‘नाशिक कवी’ ही संस्था कवितेची अखंड वाहती सरिता म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ कवी शरद पुराणिक यांनी स्थापन केलेल्या या संस्थेशी सुभाष सबनीस पहिल्या दिवसापासून जोडलेले आहेत. कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि आता अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांचा ‘नाशिक कवी’सोबतचा प्रवास दोन दशकांहून अधिक काळ सुरू आहे.
सुभाष सबनीस यांच्या साहित्यिक कारकिर्दीचीही मोठी व्याप्ती आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह तसेच ललित लेखसंग्रह अशा विविध साहित्यप्रकारांतील त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेल्या १६ वर्षांपासून ते ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाचे संपादक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, प्रकाशन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे कार्य सुरू आहे.
कै. बाळासाहेब मगर यांचे चिरंजीव इंजि. अजिंक्य मगर यांनाही वडिलांप्रमाणेच काव्य आणि साहित्याची आवड आहे. ते स्वतःही लेखन करू लागले असून, ‘नाशिक कवी’च्या आगामी वाटचालीत त्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी गझलकार बाळासाहेब गिरी, तर कार्यवाहपदी कवी नंदकिशोर ठोंबरे कायम आहेत. कार्यकारिणीत स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, अजय बिरारी, किरण मेतकर, भारती देव, राजेश जाधव, प्रांजली आफळे आणि सुरेश चौरे यांचा समावेश आहे.
‘साहित्यासाठीच सारे काही’ : सुभाष सबनीस
नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष सबनीस यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत विश्वास व्यक्त करताना सांगितले की, ‘नाशिक कवी’ या संस्थेमुळे साहित्यविश्वात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दोन तपांहून अधिक काळ ‘कवितेसाठी सारे काही’ या भावनेने काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. सर्व कार्यकारिणी सदस्य आणि नाशिककरांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला नवे परिमाण देण्याचा निश्चित प्रयत्न करू.’
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष सबनीस यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक यांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले. परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर, माणिकराव गोडसे, रवींद्र पाटील, विद्या पाटील, राजू आतकरी, श्रीराम तोकडे, रमेश मुकणे आदींसह अनेक साहित्यप्रेमींनी सबनीस यांचे अभिनंदन केले.
