पाळधीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
आरोग्याची काळजी घेण्यासह सकारात्मक व कृतीशील विचार ठेवण्याचे आवाहन
धरणगाव तालुका प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, कायदेविषयक अधिकार तसेच सकारात्मक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक इंजि. विक्रम गुलाबराव पाटील होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, आरोग्यविषयक सूचनांचे पालन करावे तसेच जीवनाकडे सकारात्मक आणि कृतीशील दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अशोक पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध कायदेविषयक तरतुदी व अधिकारांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ ठाकूर गोरख पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व मंडळातील सहभागाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील महिला व पुरुष सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
