Spread the love

व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचाही महिलेचा आरोप; आमदार अनुप अग्रवाल यांची कठोर कारवाईची मागणी, पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

धुळे प्रतिनिधी : धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३० वर्षीय विवाहितेवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नटराज टॉकीज परिसरातील रामदेव बाबा नगरात हा प्रकार घडल्याची माहिती असून, या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिचे व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल व मानसिक त्रास दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या त्रासाला कंटाळून महिलेने आझादनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिघांना ताब्यात घेतले. उपलब्ध वृत्तानुसार साहिल हबीब पिंजारी, बाबू इरफान शाह आणि समद शेख जब्बार यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अफवा पसरू नयेत यासाठी नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आझादनगर पोलीस ठाण्यात उपस्थित राहत कारवाईबाबत माहिती घेतली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version