Spread the love

दोन्ही मतदारसंघांत कोल्हापूरचे चेहरे; पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये इच्छुकांची नाराजी, महायुतीत बंडखोरीची शक्यता?

कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा करताच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवारांचे कोल्हापूरशी असलेले निकटचे संबंध पाहता भाजपने दोन्ही जागांवर ‘कोल्हापूर कार्ड’ खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही जागांसाठी एका जिल्ह्यातील चेहऱ्यांना संधी दिल्याने उर्वरित चार जिल्ह्यांतील इच्छुक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

शिक्षक मतदारसंघात ‘गावडे विरुद्ध आसगावकर’
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना मैदानात उतरवले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि संस्थेशी जोडलेले शिक्षकांचे व्यापक नेटवर्क त्यांच्या उमेदवारीमागची महत्त्वाची जमेची बाजू मानली जात आहे.

गावडे हे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विश्वासू मानले जातात. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात कोल्हापूरशी संबंधित दोन प्रभावी चेहऱ्यांमध्ये थेट लढत रंगण्याची शक्यता आहे.

पदवीधर मतदारसंघातही कोल्हापूरचा प्रभाव
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू तसेच पुढारी पब्लिकेशनच्या संचालिका आहेत. डॉ. स्मिता जाधव या डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आणि पुढारी ग्रुपचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत.

कोल्हापूरच्या माध्यम, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जाधव कुटुंबाचे प्रभावी नेटवर्क असल्याने या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाचे पाठबळ आणि पुढारी समूहाचा जनसंपर्क यामुळे भाजपने पदवीधर मतदारसंघात मजबूत सामाजिक-शैक्षणिक समीकरण उभे करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.b या निर्णयामुळे भाजपमधील शरद लाड यांच्यासह अन्य इच्छुकांच्या उमेदवारीच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

महायुतीत उमेदवारीवरून धुसफूस?
भाजपने दोन्ही जागांवर स्वतःचे उमेदवार जाहीर केल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील इच्छुकांनी या मतदारसंघांवर दावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे इच्छुक होते. मात्र, भाजपने दोन्ही मतदारसंघांवर आपले उमेदवार जाहीर केल्याने महायुतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.

बंडखोरीचे सावट?
भाजपच्या निर्णयामुळे महायुतीतील नाराजी निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष बंडखोरीच्या रूपात दिसणार का, हा आता सर्वात मोठा प्रश्न ठरला आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे मंगेश चिवटे, तर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे भाजपने संघटनात्मक ताकद, शिक्षण क्षेत्रातील संपर्क आणि कोल्हापूरचे प्रभावी नेटवर्क यांचा आधार घेत दोन्ही जागांवर रणनीती आखल्याचे चित्र आहे. मात्र, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील मतदारांना ‘दोन्ही जागा कोल्हापूरलाच का?’ असा प्रश्न पडल्यास भाजपसमोर स्थानिक नाराजीचा सामना करण्याचे आव्हान उभे राहू शकते.  त्यामुळे भाजपचे हे ‘कोल्हापूर कार्ड’ निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरणार की महायुतीतील नाराजीचा नवा अध्याय उघडणार, याचे उत्तर आगामी प्रचारात मिळणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version