Spread the love

निवडणूक आयोगाविरोधातील मुंबईतील मोर्चात उद्धव ठाकरे आक्रमक; ‘उद्या तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल’, सत्ताधाऱ्यांना इशारा

मुंबई, प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांकडून मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. मतदारयादी, एसआयआर आणि कथित ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांनी “आज पाऊल उचलले आहे, उद्या नाईलाजाने हात उचलावा लागेल,” असा इशारा दिला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “ज्ञानेश कुमार हे त्यांचं हत्यार आहे,” असा आरोप करत त्यांनी मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी लढा सुरू असल्याचे सांगितले.

‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल’
निवडणूक आयोगासह विविध संस्थांवर सरकारचा प्रभाव असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, न्यायसंस्था आणि प्रशासन ताब्यात घेतले असले तरी रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. “आज मत चोरी करायला लागले आहेत, मतदानाचा अधिकारसुद्धा काढून घेत आहेत. पण त्यांना अजून लक्षात आलेलं नाही. हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यांवर उद्या तुम्हाला फिरणं मुश्किल होऊन जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

‘बांगलादेशी शोधत असाल तर आकडे दाखवा’
एसआयआरच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. एसआयआरचा उद्देश बांगलादेशी नागरिकांचा शोध घेणे असल्याचे सांगितले जात असल्यास, महाराष्ट्रातील मतदारयादीतील वगळलेल्या मतदारांपैकी किती जण बांगलादेशी आढळले, असा सवाल त्यांनी केला. “महाराष्ट्रामध्ये एसआयआरमध्ये जे दोन कोटी मतदार वगळले त्यापैकी किती बांगलादेशी पकडले? दाखवा. आम्ही त्यांना हाकलून देतो. त्यांना सीमेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो; पण सीमा तुमच्या हातात आहेत,” असे ठाकरे म्हणाले.

‘नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढणार असाल तर…’
बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “बांगलादेशी महाराष्ट्रात घुसतात कसे? देशामध्ये कुणी घुसू दिले? राहू दिले कुणी?” असा सवाल करत भारतीय नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जात असल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. “बांगलादेशींच्या नावाखाली तुम्ही माझ्या देशाच्या नागरिकाचा मतदानाचा अधिकार काढून घेणार असाल, मग आम्हाला नाईलाजाने आज पाऊल उचलले आहे, उद्या हात उचलावा लागेल,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही टीका केली. भाजपने देशात मोठे बहुमत मिळवूनही सत्तेच्या काळात लोकांमध्ये सरकारच्या बाजूने बोलण्याची भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.“लोकांना भीती वाटते, पण ती आता यांच्या बाजूने बोलण्याची भीती वाटते,” असा टोला त्यांनी लगावला.

‘लोक पेटले तर सिंहासन जळून खाक करतील’
आपल्या भाषणाच्या अखेरीस उद्धव ठाकरे यांनी हिटलरचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. “अजूनही वेळ गेलेली नाही. लोक आज उठले आहेत. उद्या पेटले तर तुमचे सिंहासन जळून खाक करतील,” असे ते म्हणाले. हिटलरचे उदाहरण देताना त्याच्या राजवटीतील अधिकाऱ्यांनाही नंतर शिक्षा झाली, असा दावा त्यांनी केला.निवडणूक प्रक्रिया, मतदारयादी आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून मुंबईतील या मोर्चात विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version