दोन वर्षांच्या बालकाचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद; २७ दिवसांनंतर वनविभागाला यश
अर्थे येथील घटनेनंतर वनविभागाची सलग शोधमोहीम; बोराडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील दोन वर्षांच्या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. तब्बल २७ दिवसांच्या शोधमोहीमेनंतर वनविभागाला हे यश मिळाले. बिबट्या जेरबंद झाल्याने बोराडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
९ सप्टेंबर रोजी अर्थे गावाच्या शिवारात बिबट्याने दोन वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्याला जबड्यात धरून ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या.
घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. विविध ठिकाणी सापळे लावून त्याचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, भरवाडे शिवारातील पांडुरंग माळी यांच्या शेतात बिबट्या आढळून आल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी पथकाने कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, बंदुकीच्या गोळीने बिबट्याला बेशुद्ध करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
२७ दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहीमेला अखेर यश आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने अर्थे, बोराडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कारवाईत ग्रामस्थांची सतर्कता तसेच वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्परता महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात आले.
