Spread the love

माळेगाव पिंपरी जि.प. शाळेच्या बांधकामाची चौकशी; शिवराम जाधव यांच्या तक्रारीला यश

माहिती फलक नसल्याचा आरोप; निकृष्ट कामाच्या तक्रारीवर BDO कडून उपअभियंत्यांना तातडीने चौकशीचे आदेश

सोयगाव, दि. ९ सप्टेंबर : ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी अंतर्गत मौजे पिंपरी (ता. सोयगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचे तसेच अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करत दैनिक जन सम्राट टाईम्सचे प्रतिनिधी शिवराम दगडू जाधव यांनी पंचायत समिती सोयगावकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत गट विकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव यांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी पत्र क्र. जा.क्र.प्रस/बांध/कावि/२०२६/१६१० अन्वये उपअभियंता, बांधकाम उपविभाग, सिल्लोड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित मूळ अर्जावर कार्यवाही करून चौकशीचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

तक्रारीत नेमके काय?

तक्रारदार शिवराम जाधव यांनी ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी, मौजे पिंपरी येथील जि.प. शाळेच्या नवीन इमारत बांधकामाबाबत माहिती फलकाचा अभाव आणि अंदाजपत्रकाबाहेर अथवा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशात तक्रारीचा संदर्भ देत संबंधित विभागाने मूळ अर्जावर आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष तांत्रिक पाहणी आणि चौकशी अहवालातून बांधकामाच्या दर्जाबाबतचे वास्तव स्पष्ट होणार आहे.

‘अंदाजपत्रकानुसार काम होते की नाही, हे समोर येईल’

याबाबत प्रतिक्रिया देताना तक्रारदार शिवराम जाधव म्हणाले, “शाळेच्या कामावर माहिती फलक नसेल तर कामाची माहिती नागरिकांना कशी मिळणार? BDO साहेबांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता प्रत्यक्ष काम अंदाजपत्रकानुसार आणि निर्धारित दर्जाप्रमाणे झाले आहे की नाही, हे चौकशीतून समोर येईल.”

दरम्यान, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी संबंधित ठेकेदार किंवा अभियंत्याविरोधात कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसून, तांत्रिक चौकशी अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.

पेमेंटबाबतही ग्रामस्थांची मागणी

बांधकामाची तांत्रिक तपासणी करून कामात अनियमितता अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक लावून कामाची माहिती सार्वजनिक करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पेमेंटबाबत नियमांनुसार निर्णय घ्यावा, अशीही मागणी पुढे आली आहे.

आता उपअभियंता स्तरावर होणाऱ्या चौकशीत बांधकामाचा दर्जा, अंदाजपत्रकातील तरतुदी, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि माहिती फलकाच्या नियमांचे पालन याबाबत काय निष्कर्ष निघतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version