जिवंतपणी घरातील ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मुकुंद गोसावी
पितृपक्ष व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धानोरा येथील मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात दिव्यांग व ज्येष्ठांना सहायक साहित्याचे वाटप
जळगाव, विशेष प्रतिनिधी : “जिवंतपणी घरातील ज्येष्ठांची सेवा करणे हेच खरे महापुण्यदायी कर्म आहे. पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्यास चारधामासह देवलोकही सदैव प्रसन्न राहतो. निरपेक्ष आणि परोपकारी कार्यासोबत सकारात्मक विचारांची साथ असेल तर आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्य सदस्य मुकुंद गोसावी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आणि पितृपक्षाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या वतीने धानोरा (ता. चोपडा) येथील कॅ. आण्णासो नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात १ ऑक्टोबर रोजी विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात गरजू ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारचे सहायक साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
वृद्धापकाळात निर्माण होणाऱ्या शारीरिक मर्यादा आणि दैनंदिन हालचालींमधील अडचणी लक्षात घेऊन व्हीलचेअर, टॉयलेट कमोड, काठी/स्टिक, मान, गुडघा व कंबरेचे पट्टे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. आवश्यक सहायक साधने मिळाल्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी सुलभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी मुकुंद गोसावी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ज्येष्ठ नागरिकांची सेवा, सामाजिक बांधिलकी आणि निराधार घटकांना मदतीचा हात देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या मनोगतातून त्यांनी रेडक्रॉस सोसायटीच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली.
‘ज्येष्ठ नागरिक समाजाचा अमूल्य ठेवा’
संस्थेचे उपाध्यक्ष हुकूमचंद दत्तात्रय पाटील म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा अमूल्य ठेवा आहेत. त्यांच्या अनुभवांचा आदर करणे आणि उत्तरायुष्यात आरोग्य व गतिशीलतेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. भारत सरकारचा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून अशा सामाजिक योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले जात आहे.”
साहित्य स्वीकारताना वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले. सहायक साहित्याच्या वाटपामुळे वृद्धाश्रमात आपुलकीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अशासकीय सदस्य तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्य सदस्य मुकुंद गोसावी, केंद्रप्रमुख एस. पी. गणेशकर, कॅ. आण्णासो नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा उषाबाई रवींद्र पाटील, उपाध्यक्ष हुकूमचंद दत्तात्रय पाटील, वृद्धाश्रमातील कर्मचारी, नातेवाईक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल वृद्धाश्रम प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
