Spread the love

आंबेडकरी नेत्यांची जळगावात एकजूट; उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा!

“जाती-जातींत तणाव निर्माण करण्याचा डाव हाणून पाडा”; प्रा. जोगेंद्र कवाडेंचे आवाहन

डॉ. आनंदराज आंबेडकरांकडून मोर्चाच्या उपस्थितीवर खंत, “जाती-जातींमध्ये तणाव निर्माण करण्याचा हेतू हाणून पाडा”

जळगाव | विशेष प्रतिनिधी : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून जळगावात रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी आंबेडकरी चळवळीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले. शासनाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात लोक संघर्ष समितीतर्फे जनआक्रोश व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातून आरक्षणाच्या प्रश्नावर तीव्र विरोध व्यक्त करण्याबरोबरच आंबेडकरी चळवळीतील वाढती गटबाजी, संघटनात्मक विखुरलेपणा आणि तरुणांची भूमिका यावरही नेत्यांनी परखड भाष्य केले.

या महामोर्चाचे संयोजन मुकुंद सपकाळे यांनी केले. मोर्चात रिपब्लिकन सरसेनानी डॉ. आनंदराज आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, दीपक केदार यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आपला रोष व्यक्त केला.

“जाती-जातींमध्ये तणाव निर्माण करण्याचा हेतू हाणून पाडा”
मोर्चाला संबोधित करताना प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शासनाच्या उपवर्गीकरणाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “शासनाचा आरक्षण उपवर्गीकरण करण्यामागे जाती-जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा हेतू आहे. हा हेतू हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी समाजाने सज्ज झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

आंबेडकरी चळवळीच्या वर्तमान स्थितीवरही कवाडे यांनी चिंता व्यक्त केली. कालची आंबेडकरी चळवळ ही जिवंतपणाचे आणि संघर्षशीलतेचे लक्षण होती; मात्र आज गटातटांत विभागली गेल्याने तिचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“तरुणांनो, जागे व्हा. तुम्ही आंबेडकरी चळवळीचे भविष्य आहात,” असे आवाहन करत त्यांनी तरुणांनी संघटित होऊन चळवळीला नवी दिशा देण्याची गरज व्यक्त केली.

“जळगावचा मोर्चा अपेक्षेइतका भव्य नाही”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सरसेनानी डॉ. आनंदराज आंबेडकर यांनीही आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह विविध ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले. त्या तुलनेत जळगावातील मोर्चा अपेक्षेइतका भव्य झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका घटकाचा नसून सामाजिक न्यायाच्या व्यापक लढ्याशी संबंधित असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि संघटन उभे करण्याची आवश्यकता असल्याचा सूर त्यांच्या भाषणातून उमटला.

दीपक केदारांनी अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली
अखिल भारतीय पँथर सेनेचे दीपक केदार यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजावर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला. सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी आंबेडकरी समाजाने एकजूट राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

केदार यांच्या आक्रमक आणि परखड भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक प्रश्नांवर आंबेडकरी समाजाच्या भावना त्यांनी व्यासपीठावरून मांडल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

“मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबवल्या”
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्याचे सांगितले. सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोर्चाच्या व्यासपीठावर जगदीश सपकाळे, गुजरातचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव सैंदाणे, जगन सोनवणे, राजू सूर्यवंशी, शिवसेना मागासवर्गीय जिल्हाप्रमुख मुकुंदराव नंन्नवरे, धरणगाव शिवसेना मागासवर्गीय सेनेचे तालुकाध्यक्ष मोहन शिंदे, राजूभाऊ मराठे, मिलिंद सोनवणे, मिलिंद पवार, सुधीर जंजाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सुरेशभाई सोनवणे यांची लक्षवेधक उपस्थिती
जळगावातील आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील महामोर्चात गुजरातचे नेते सुरेशभाई सोनवणे यांच्या उपस्थितीकडे आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या उपस्थितीची मोर्चाच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली. गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागांतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाल्याचे दिसून आले.

व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक? संयोजकांविरोधात नाराजी
मोर्चाच्या यशासाठी प्रत्यक्ष मैदानात मेहनत घेणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटला. मोर्चाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेऊनही काही कार्यकर्त्यांना व्यासपीठावर अपेक्षित स्थान मिळाले नाही, अशी खंत संबंधित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

“ज्यांनी मोर्चासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली, त्यांनाच व्यासपीठावर दुय्यम वागणूक मिळाली,” अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे आयोजकांच्या नियोजनाबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा मोर्चास्थळी होती.

आरक्षणाच्या लढ्यासोबत संघटनात्मक एकजुटीचे आव्हान
जळगावातील महामोर्चाने आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला असला, तरी या निमित्ताने आंबेडकरी चळवळीसमोरील संघटनात्मक आव्हानेही प्रकर्षाने पुढे आली. एका बाजूला विविध नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याचे सकारात्मक चित्र दिसले; तर दुसरीकडे कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि गटबाजीची चर्चा देखील समोर आली.

आरक्षणाच्या प्रश्नावर संघर्ष उभा करताना नेत्यांपेक्षा चळवळ आणि कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची गरज असल्याचा संदेश या महामोर्चातून पुढे आला. विशेषतः तरुणांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांसाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

उपवर्गीकरणाचा मुद्दा आगामी काळात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिक तापण्याची शक्यता असताना जळगावातील या महामोर्चाने आंबेडकरी चळवळीतील विविध गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही एकजूट केवळ मोर्चापुरती मर्यादित न राहता पुढील आंदोलनांमध्ये आणि संघटनात्मक पातळीवर कितपत टिकते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version