Spread the love

श्री बालाजी संस्थानच्या कारभाराची SIT चौकशी करा; चौकशीपर्यंत प्रशासक नियुक्त करा

आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांची पत्रकार परिषदेत मागणी; महाप्रसाद निधी, सोने-चांदी व देणग्यांच्या हिशेबावर पारदर्शकतेचा सवाल

पारोळा, प्रतिनिधी – संदीप पाटील | दि. ४ ऑक्टोबर २०२६

पारोळा शहराची सुमारे ३७५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत श्री बालाजी महाराज संस्थानच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संस्थानच्या संपूर्ण कारभाराची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थानवर प्रशासक नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्री बालाजी महाराज हे पारोळा शहरासह परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशेषतः ब्रह्मोत्सवाच्या काळात संस्थानला मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने, चांदी, आभूषणे तसेच विविध स्वरूपातील देणग्या प्राप्त होत असतात. त्यामुळे या देणग्यांची नोंद, त्यांचा हिशेब, संस्थानचे आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णय यामध्ये पूर्ण पारदर्शकता असणे गरजेचे आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

महाप्रसाद समितीच्या निधीच्या हस्तांतरणावर सवाल

संस्थानची नोंदणी होण्यापूर्वी स्वतंत्र महाप्रसाद समिती कार्यरत होती. गावातील नागरिकांना आजीवन सभासद करून स्व. अण्णासाहेब रामदास तुकारामशेठ वाणी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे ब्रह्मोत्सवानंतर संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत होते.

मात्र, स्व. अण्णासाहेब वाणी यांच्या निधनानंतर ही समिती बंद करून स्वतंत्र ‘व्यंकटेश महाप्रसाद व अन्नछत्र मंडळ’ स्थापन करण्यात आले. महाप्रसादासाठी जमा झालेला निधी या नवीन संस्थेकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निधीच्या हस्तांतरणाचा संस्थानच्या एकत्रित ऑडिटमध्ये स्पष्ट उल्लेख का नाही, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

सोने-चांदी, रोख देणग्यांच्या नोंदींचीही चौकशीची मागणी

भाविकांकडून संस्थानला प्राप्त होणाऱ्या सोने-चांदीच्या वस्तू, आभूषणे, रोख देणग्या तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या नोंदी आणि त्यांचा हिशेब याबाबतही पारदर्शकता असणे आवश्यक आहे. या सर्व व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी होणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

संस्थानच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची SIT मार्फत निष्पक्ष, सखोल आणि सर्वंकष चौकशी करण्यात यावी. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थानवर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

भाविकांच्या श्रद्धेचा विषय; पारदर्शक कारभाराची गरज

श्री बालाजी महाराज संस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून पारोळा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले श्रद्धास्थान आहे. त्यामुळे संस्थानच्या कारभारात आर्थिक शुचिता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राहणे आवश्यक आहे. भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेल्या संस्थानच्या व्यवहारांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची वस्तुस्थिती निष्पक्ष चौकशीतून जनतेसमोर यावी, अशी भूमिका आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version