Spread the love

पहाण गावातील पाणीपुरवठ्याच्या टाकीची दुरवस्था; झाकण नसल्याने दूषित पाण्याचा धोका

टाकीवर वानरांचा वावर, पक्ष्यांची विष्ठा; ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, वाल्मीक जाधव यांची मागणी

पहाण | प्रतिनिधी : पहाण गावातील नागरिकांना ज्या पाणीपुरवठा टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या टाकीची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. टाकीवर झाकण नसल्याने धूळ, घाण तसेच पक्षी व वानरांचा वावर वाढला असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील संपूर्ण पाणीपुरवठा या टाकीतून होत असल्याने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. टाकीच्या परिसरात वानरांचा मोठ्या प्रमाणात वावर असून, त्यांच्या विष्ठेमुळे पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे टाकीवर पक्ष्यांचाही वावर असल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पाणीपुरवठ्याच्या टाकीला अनेक वर्षांपासून झाकण नसतानाही ग्रामपंचायतीकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी दूषित झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने संभाव्य आजारांचा धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेने या समस्येची तातडीने दखल घेऊन पाण्याची टाकी स्वच्छ करावी, टाकीवर सुरक्षित झाकण बसवावे आणि नियमित देखभाल व पाणी तपासणीचे नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दोन दिवसांत झाकण न बसवल्यास आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक जाधव यांनीही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. दोन दिवसांत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर झाकण बसविण्यात आले नाही, तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गावकऱ्यांच्या जीविताशी खेळ न करता ग्रामपंचायत आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ व राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version