Spread the love

भडगाव तालुक्यातील २५ क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहार किटचे वाटप

आयुध निर्माणी वरणगावच्या CSR निधीतून मदतीचा हात; जिल्ह्यातील ६४१ क्षयरुग्णांना फूड बास्केट व औषधांची मदत

भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ :
प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत भडगाव तालुक्यातील क्षयरोग रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार व औषध वाटप कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, भडगाव येथे उत्साहात पार पडला. आयुध निर्माणी वरणगाव यांच्या CSR निधीतून तालुक्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भडगाव तालुक्यातील २५ क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये गहू, डाळ, खाद्यतेल, दूध पावडर आदी जीवनावश्यक व पोषणमूल्य असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

आयुध निर्माणी वरणगावकडून गेल्या तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांना CSR निधीतून नियमितपणे पोषण आहाराची मदत केली जात आहे. यावर्षीही ही सामाजिक बांधिलकी कायम ठेवत जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी एकूण ६४१ फूड बास्केट किट तसेच औषधांची मदत करण्यात आली.

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात केवळ औषधोपचाराबरोबरच रुग्णांना पौष्टिक आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे CSR निधीतून करण्यात येणारी ही मदत रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला आणि आरोग्य सुधारण्याला निश्चितच हातभार लावणारी ठरत आहे.

हा कार्यक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, मोनाली कदम (WHO Consultant), डॉ. विशाल पाटील आणि डॉ. शांताराम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी आरोग्य सहाय्यक जयराम महाजन, मिलिंद धुळे, सुरेखा धनगर आदी उपस्थित होते. या उपक्रमातून क्षयरोग रुग्णांना उपचारांसोबत पोषणाचा आधार देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version