देशमुख महाविद्यालयात रंगल्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा
पुरुष गटात चाळीसगाव महाविद्यालयाची बाजी; महिला गटात प्रताप महाविद्यालय अमळनेर विजयी
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो (पुरुष व महिला) स्पर्धा भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन भडगाव नगरपरिषदेचे नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या स्पर्धेत पुरुष गटात बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय, चाळीसगाव यांच्या संयुक्त संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिला गटात प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरीचा संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेत सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (भडगाव), बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय (चाळीसगाव), प्रताप महाविद्यालय (अमळनेर), दादासो डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय (चोपडा), एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय (बांभोरी) तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (धरणगाव) यांच्या संघांनी सहभाग नोंदवला.
यावेळी डॉ. देवदत्त पाटील (कला महाविद्यालय, मारवड), डॉ. शैलेश पाटील (धनदाई महाविद्यालय, अमळनेर), डॉ. क्रांती क्षीरसागर (दादासो डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा), डॉ. सचिन पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), डॉ. दीपक पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव), प्रा. खुशाल देशमुख (चाळीसगाव महाविद्यालय) आणि प्रा. शिरसाट (एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी) आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी केले. महाविद्यालयाचे माजी खो-खो खेळाडू रवींद्र महाजन व प्रशांत सोळंके यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व सहभागी संघ, खेळाडू, पंच व आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.
