Spread the love

सुजात आंबेडकर यांच्यावरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी कारवाईची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; दोन फेसबुक अकाउंटची सायबर तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

सोयगाव / सावळदबारा | प्रतिनिधी – मनोहर जगताप :
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात दादा आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषेत कमेंट करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, छत्रपती संभाजीनगर (पूर्व) यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) रामेश्वर तायडे यांची स्वाक्षरी असून, विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.

सोशल मीडिया कमेंट्सवर आक्षेप

निवेदनानुसार, सुजात आंबेडकर यांनी ‘जय भीम Gen-Z’ या कार्यक्रमादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना शहराच्या नामकरणासंदर्भात आपले मत व्यक्त केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या विषयावर चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यान काही फेसबुक अकाउंटवरून सुजात आंबेडकर यांच्याबद्दल अश्लील, अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषेत कमेंट करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात दोन फेसबुक अकाउंटचा उल्लेख करण्यात आला असून, संबंधित कमेंट्सचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून जोडण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

वंचितच्या चार प्रमुख मागण्या

वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.

१. संबंधित दोन्ही फेसबुक अकाउंटची सायबर तांत्रिक पद्धतीने पडताळणी करून अकाउंट चालविणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित करावी.

२. संबंधित कमेंट्स, फेसबुक अकाउंटची माहिती, पोस्टच्या लिंक तसेच उपलब्ध डिजिटल पुरावे ताब्यात घेऊन सखोल तपास करावा.

३. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सायबर पद्धतीने पुढील कारवाई करावी.

४. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सामाजिक तेढ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित व्यक्तींवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

राजकीय किंवा सामाजिक विषयांवर मतभेद असले तरी सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरणे टाळले पाहिजे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर अमित बुईरगड, सतीश गायकवाड, स्वप्नील गाडेकर, ॲड. पंकज बनसोडे, मतीन पटेल, संदीप जाधव, अकरम खान, वंदना जाधव, राहुल मगनराम, निखिल बोर्डे, तसेच सोयगाव तालुका अध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version