Spread the love

स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांवर भुसावळमध्ये खल

धान्याचा दर्जा, वजन, ई-केवायसीसह राजकीय दबाव व दुकानदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा; मुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय

भुसावळ | प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे :
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे पार पडली. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला तालुक्यातील सुमारे ७० ते ८० स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

बैठकीत स्वस्त धान्य दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, मार्जिन, धान्याचा दर्जा व वजन, ई-केवायसी, राजकीय दबाव तसेच दुकानदारांच्या सुरक्षेसह विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर विविध मागण्यांबाबत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आले.

दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत धान्य देण्याची मागणी

स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत स्वच्छ व चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच शासकीय धान्य गोदामातून प्रत्येक गोणीमध्ये ५० किलो ५८० ग्रॅम वजनाचे धान्य पूर्णपणे देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

लाभार्थ्यांना वितरित होणारे धान्य स्वच्छ आणि मानवी सेवनासाठी योग्य असावे. अस्वच्छ किंवा खराब धान्याचा पुरवठा करू नये, अशी भूमिका दुकानदारांनी मांडली.

राजकीय दबाव व कथित खोट्या तक्रारींचा मुद्दा ऐरणीवर

तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध राजकीय दबावातून खोट्या तक्रारी करून त्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. अशा प्रकारचा दबाव टाकण्याच्या प्रकाराचा दुकानदारांनी निषेध व्यक्त केला.

तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रारीची वस्तुनिष्ठ शहानिशा करूनच कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना लवकरच निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ई-केवायसीबाबत दुकानदारांची भूमिका

लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांकडून वारंवार सूचना दिल्या जात असतानाही काही लाभार्थी जाणूनबुजून ई-केवायसी करत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ई-केवायसी न झाल्याचा दोष थेट स्वस्त धान्य दुकानदारांवर टाकू नये, अशी मागणी करण्यात आली.

दुकानदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही चर्चेत

स्वस्त धान्य दुकानदारांना काही ठिकाणी शिवीगाळ तसेच मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अशा प्रकारे दुकानदारांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

दुकानदारांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय, भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, महिला आघाडीच्या टीना धांडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, तसेच नाना पाटील, ईश्वर पवार, नितीन जैन, आर. बी. चौधरी, शांताराम इंगळे, प्रतीक आंबेकर, उल्हास भारसके, नमा शर्मा, पी. एस. माखीजा, रमेश भिला पवार, छाया बोंडे, संतोष माळी, गोपाळ परदेशी यांच्यासह तालुक्यातील ७० ते ८० स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version