दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – जलसंपदामंत्री गिरीश महाजन
पातरखेडे येथे पिकांची पाहणी; पंचनामे, शासकीय मदत व दुष्काळी उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना
एरंडोल-पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील : एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पातरखेडे येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांची झालेली दुरवस्था आणि त्यातून शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले आर्थिक संकट याबाबत यावेळी प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडण्यात आली.
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल आणि भडगाव हे तीनही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या विविध सवलती, मदत व योजनांचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, शासकीय मदत आणि दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली.
दुष्काळाच्या परिस्थितीत मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक प्रा. पै. मनोजभाऊ पाटील, पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख मनिषभाऊ पाटील, एरंडोल येथील जावेद मुजावर, अंतुर्लीचे सरपंच गौरव पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पिठलं-भाकरीचा आस्वाद
दरम्यान, स्थानिक शेतकरी बांधवांनी आयोजित केलेल्या पिठलं-भाकरीच्या भोजनाचा मान्यवरांनी आस्वाद घेतला. शेतकरी बांधवांनी केलेल्या या आत्मीय आदरातिथ्यामुळे कार्यक्रमाला आपुलकीचे वातावरण लाभले.
