‘ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव!
चित्रफितीतून आणि मान्यवरांच्या भाषणांतून उलगडला संघर्षशील जीवनपट; अमृतमहोत्सवी सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
धुळे, ता. ५ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. ५) अभीष्टचिंतनासह सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुंबई-आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्ट येथे झालेल्या या रंगतदार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह धुळेकरांची मोठी उपस्थिती होती.
अमृतमहोत्सव समितीतर्फे ओमप्रकाश अग्रवाल यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानपत्र, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनप्रवासावर तयार करण्यात आलेली चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. तसेच विविध मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणांतून त्यांच्या संघर्षशील जीवनप्रवासाला उजाळा देत त्यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, मंजुळा गावित, राजूमामा भोळे, अमोल जावळे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, ज्येष्ठ उद्योजक विनोद मित्तल, डॉ. महेश घुगरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे यांच्यासह अमृतमहोत्सव समितीच्या सदस्यांच्या हस्ते ओमप्रकाश अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार अनुपभैयांची विविध संस्थांना देणगी
यावेळी प्रास्ताविक करताना आमदार अनुपभैया अग्रवाल म्हणाले की, वडील ओमप्रकाश अग्रवाल यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला आणि अमृतमहोत्सव समितीला लाभले. गेल्या ७५ वर्षांपासून धुळेकरांनी अग्रवाल परिवाराला दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्याला जनसेवक आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धुळेकरांचे आभार मानत त्यांनी आपल्या आमदारपदाच्या वेतनातून ११ लाख रुपयांचा धनादेश दुष्काळी निधीसाठी शासनाला देण्याची घोषणा केली. तसेच डॉ. दुग्गल स्मृती समितीच्या मातोश्री वृद्धाश्रमासाठी दरवर्षी दोन लाख रुपये आणि आदिवासींसह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत देवगिरी कल्याण आश्रमासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
सर्वसामान्यांचे हित जोपासणारा नेता
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती जिद्द, कष्ट, संघर्ष आणि निरपेक्ष भावनेतून काम करत असेल तर यश नक्कीच मिळते. ओमप्रकाश अग्रवाल हे त्याचे उदाहरण आहेत. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या उभारणीसह विविध क्षेत्रांत काम करताना त्यांनी सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले.
‘ओपी शेट’ यांनी लावलेल्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला असून, त्याची सावली आणि फळे आज अनेकांना मिळत आहेत, असे गौरवोद्गार रावल यांनी काढले.
ओपीजींचे जीवन आदर्शवत
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे म्हणाले की, जीवनात किती पैसा कमावला यापेक्षा आपली मुले कशी घडली, याला अधिक महत्त्व असते. ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिलेल्या संस्कारांचे प्रतिबिंब त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक कार्यातून दिसून येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या ओपी शेट यांनी लहानपणापासून संघर्षाची वाट धरली. सर्वसामान्यांच्या कल्याणाची कास धरल्यामुळेच त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीलाही सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या जीवनप्रवासातून आजच्या तरुण पिढीला प्रेरणा घेता येईल, असे सावकारे यांनी सांगितले.
संघर्षातून साधला उत्कर्ष
आमदार अमरिशभाई पटेल यांनी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या कुटुंबाशी असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. ओमप्रकाश अग्रवाल यांच्या पत्नी तथा अनुपभैयांच्या मातोश्री (कै.) विमलादेवी यांचे माहेर शिरपूरचे असल्याचे सांगत पटेल यांनी अग्रवाल परिवाराशी असलेल्या कौटुंबिक संबंधांच्या आठवणी सांगितल्या.
ओपी शेट यांनी जीवनाच्या सुरुवातीच्या काळात केलेला संघर्ष आणि त्यातून साधलेला उत्कर्ष, तसेच त्यांनी दिलेले संस्कार यामुळेच अनुपभैया घडले. आता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याची जबाबदारी अनुपभैयांवर आहे. त्यासाठी ओपी शेट यांनी दिलेले विचार आणि संस्कारांची कास धरून कार्यरत राहावे, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली.
चौकट : ओपीजींचे जीवन प्रत्येकासाठी अनुकरणीय
ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक म्हणाले की, ओमप्रकाशजींचे वडील पुरणमलजी राजस्थानातून धुळ्यात आल्यानंतर जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम निष्ठेने करत होते. वडिलांच्या संस्कारांमुळेच ओपी शेट संघाशी एकरूप झाले.
दुर्लक्ष, टिंगल, टीका, समजून घेण्याची भूमिका आणि त्यानंतर गौरव किंवा कौतुकाचा टप्पा, असा जीवनप्रवासातील अमृतमहोत्सवाचा टप्पा असतो. ओपी शेट यांचाही जीवनप्रवास या टप्प्यांतून घडला आहे.
भूतकाळातून शिकत वर्तमानातून विकास साधण्याची दृष्टी त्यांनी कायम ठेवली. कष्टाची जाणीव ठेवत त्यांनी सातत्याने माणसे जोडण्याचे काम केले. संघ आणि भाजपमध्ये काम करताना अनेक पदे भूषवूनही ते कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहिले. निरपेक्षपणे जगताना त्यांनी यशाचे श्रेय स्वतःपुरते न ठेवता सर्वांचे मानले.
“आनंदात हुरळायचे नाही, दुःखात नाउमेद व्हायचे नाही, कष्टात चिंता करायची नाही आणि संघर्षात थांबायचे नाही,” या जीवनमूल्यांचा आदर्श ओमप्रकाश अग्रवाल यांनी घालून दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन मानवी साखळी निर्माण करणारे त्यांचे जीवन प्रत्येकासाठी अनुकरणीय आहे. पुढील पिढीवरही हाच संस्कार व्हावा, अशी अपेक्षा प्रा. पाठक यांनी व्यक्त केली.
