अभिजात मराठीचा जागर; ग्रंथ प्रदर्शनातून वाचनसंस्कृतीला बळ
धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन व सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
धरणगाव | प्रतिनिधी : अभिजात मराठी भाषा दिन व सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मराठी साहित्याची ओळख व्हावी आणि समृद्ध वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैंदाने, केंद्रप्रमुख डॉ. भिकन शिरसाट, प्रदीप जाधव, मनोहर नेरकर, सुनील पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, माजी पर्यवेक्षक राजेंद्र पडोळ, उपमुख्याध्यापक ए. एस. पाटील आणि पर्यवेक्षिका भारती पाटील उपस्थित होते.
विविध साहित्याने सजले ग्रंथ प्रदर्शन
प्रदर्शनात विविध विषयांवरील साहित्य, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, ऐतिहासिक ग्रंथ, ज्ञानवर्धक पुस्तके तसेच मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांचा परिचय करून देणारे ग्रंथ मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देत विविध पुस्तकांची माहिती जाणून घेतली.
मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्याची विविधता आणि वाचनातून मिळणारे ज्ञान याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यास या प्रदर्शनामुळे हातभार लागला.
आयोजनासाठी शिक्षकांचे परिश्रम
ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल अनिल पाटील, मराठी विषयाचे अध्यापक स्वरूप पाटील, उपशिक्षिका कविता पाटील, शशिकांत पाटील, पंकज कोळी आणि पियुष साळुंखे यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, विद्यालयाच्या या सुंदर व उपयुक्त उपक्रमाचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील, अश्विनकुमार पाटील आणि भरत पाटील यांनी कौतुक केले.
अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दलची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
