चिनावल मध्ये तरुणाचीस्वतःने गोळी झाडून आत्महत्या ; गावठी कट्ट्याचा वापर
सावदा ग्रामीण रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद, घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट
सावदा | प्रतिनिधी – अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (६ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने चिनावल परिसरात खळबळ उडाली आहे.
निर्मल युवराज महाजन (वय २७, रा. चिनावल, ता. रावेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावर दुखापत आढळून आली असून, संबंधित दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या लेखी मेमोवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २२/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत. तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध बाबींचा तपास सुरू आहे.
