नरडाणा एमआयडीसीत ८० हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त!
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत कारवाई; तीन ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे नमुने प्रयोगशाळेत
धुळे, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या धुळे पथकाने नरडाणा एमआयडीसीतील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उत्पादन करणाऱ्या आस्थापनावर कारवाई केली. तपासणीदरम्यान तीन प्रकारच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, संशयित साठ्यातील ८० हजार २०८ पेट बाटल्या, अंदाजे ८ लाख १ हजार ६३२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यातील शिवाय बिव्हरेजेस एलएलपी, प्लॉट क्र. टी-११, नरडाणा इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, नरडाणा, ता. शिंदखेडा, जि. धुळे या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली.
तीन प्रकारच्या पाण्याचे नमुने घेतले
तपासणीदरम्यान ‘बरेली’ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, ‘ग्रीष्मा एक्वा’ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि ‘एक्वा अजंता’ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर या तीन अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
सदर अन्न पदार्थ मिथ्या छापाचे तसेच कमी दर्जाचे असल्याचा संशय असल्याने उर्वरित साठा तातडीने जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची एकूण संख्या ८०,२०८ पेट बाटल्या असून त्याची किंमत ८,०१,६३२ रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई
घेतलेले अन्न नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
ही कारवाई मंगेश माने, सह आयुक्त, नाशिक, गो. वी. माहोरे, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अभिजीत जाधव तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्यास नमुने तपासणीसाठी घेऊन कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.
