Spread the love

घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या चौकशीत ‘बनावट पंचनामा’चा आरोप!

तक्रारदाराच्या आक्षेपानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची तातडीची दखल; भुसावळ तहसीलदारांकडून सविस्तर अहवाल मागविला

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारीच्या चौकशीला आता गंभीर वळण मिळाले आहे. चौकशीदरम्यान नियमबाह्य पद्धतीने ‘बनावट पंचनामा’ तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केल्याने पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत भुसावळ तहसीलदारांना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब, आवश्यक पुरावे आणि स्पष्ट अभिप्रायासह सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारीनंतर स्थळ पाहणी

भुसावळ येथील माऊली प्लाझा, श्रद्धानगर, जामनेर रोड परिसरातील रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी, भुसावळ यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी संत गजानन महाराज मंदिर परिसरात स्थळ पाहणी केली होती.

मात्र, या पाहणीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या प्रक्रियेवरच तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे. पंचनामा तयार करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा तसेच बनावट पंचनामा तयार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी

तक्रारदाराने पंचनामा व चौकशी प्रक्रियेतील विविध बाबींवर मुद्देनिहाय आक्षेप नोंदवल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी भुसावळ तहसीलदारांना चौकशीचे निर्देश दिले असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यास सांगितले आहे.

तसेच चौकशीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व पुरावे तपासून, त्याबाबतचा स्पष्ट अभिप्रायासह सविस्तर अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमका पंचनामा कसा तयार करण्यात आला, त्यातील नोंदी वस्तुस्थितीशी जुळतात का आणि चौकशी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, याबाबत आता प्रशासनाकडून स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

भारत पेट्रोलियमकडेही कागदपत्रे रवाना

दरम्यान, या प्रकरणात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्तरावरही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. विक्री अधिकारी अथवा तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित कागदपत्रे व तक्रारदाराने उपस्थित केलेले आक्षेप क्षेत्रीय अधिकारी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बाटलिंग प्लँट, एमआयडीसी, जळगाव यांच्याकडे पुढील नियमानुसार कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे.

गॅसच्या व्यावसायिक वापराचा मुद्दा ऐरणीवर

घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, या प्रकरणात चौकशी करणाऱ्या यंत्रणेनेच तयार केलेल्या पंचनाम्यावर गंभीर आक्षेप घेण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर होणाऱ्या चौकशीत ‘बनावट पंचनामा’च्या आरोपामागील सत्य काय, यासह घरगुती गॅसच्या कथित व्यावसायिक वापराबाबतही काय निष्पन्न होते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version