Spread the love

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन; सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळ्यात पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण, मशाल यात्रेतून विकसित भारताचा संकल्प

धुळे, दि. ७ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ सरकारचे प्रयत्न पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाने आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात यथार्थ योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने सेवा संकल्प अभियानांतर्गत नवी दिल्ली येथून केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण धुळ्यातील मालेगाव रोडवरील आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री रावल बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार अनुपभैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, कल्पना महाले, प्रतिभा चौधरी यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गुजरात मॉडेल’पासून देशाच्या विकासाची झेप

पालकमंत्री रावल म्हणाले की, ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि २०१४ पासून देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात झालेला विकास देशभरात ‘गुजरात मॉडेल’ म्हणून ओळखला गेला. त्यानंतर पंतप्रधान म्हणून गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विविध क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरता आणि विविध क्षेत्रांतील विकासामुळे भारताची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ईशान्य भारतापर्यंत विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. देशापुढील अनेक आव्हानांवर केंद्र सरकारने मात केली असून, भारताच्या विकासाच्या या मॉडेलकडे जगातील अनेक देशांचे लक्ष वेधले गेले आहे, असेही रावल यांनी नमूद केले.

विकसित भारताचा संकल्प करूया

१४० कोटी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी अहोरात्र कार्यरत आहेत. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या विकासामुळे जगातील अनेक प्रमुख राष्ट्रे भारतात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे देशात पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे, असे रावल म्हणाले.

पंतप्रधानांच्या कार्यातून प्रेरणा घेत आपापसांतील हेवेदावे बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत मशाल यात्रा

कार्यक्रमानंतर विकसित भारताचा संकल्प करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली.

स्मारकस्थळी पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मशाल यात्रेत आमदार अनुपभैया अग्रवाल, आमदार राम भदाणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version