Spread the love

जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरकारभाराविरोधात उपोषणाचा दुसरा दिवस

मागण्या मान्य न झाल्यास महिला, युवकांसह ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

जरंडी, ता. सोयगाव / शिवराम जाधव (प्रतिनिधी) : मौजे जरंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित गैरकारभार व आरोग्य सेवांमधील त्रुटींविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दोन दिवस उलटूनही प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

समस्त ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती, सोयगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रुग्णांशी असभ्य वर्तन, आरोग्य सेविकेकडून रील तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे, औषधनिर्माता उपलब्ध असतानाही शिपायामार्फत औषधांचे वाटप करणे, अशा विविध गंभीर बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये रिक्त पदे तातडीने भरणे, आवश्यक यंत्रसामुग्री व औषधसाठा कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे, औषधांचे वाटप औषधनिर्मात्याकडूनच करणे, सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे तसेच २४ तास कर्मचारी उपलब्ध ठेवून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, या मागण्यांचा समावेश आहे.

“मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार”

उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “दोन दिवस झाले, मात्र प्रशासन झोपले आहे. यालाच शासन-प्रशासन म्हणायचे का? उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास परिसरातील महिला, युवक व संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल होतील आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वी तालुका प्रशासनाने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version