धुळ्याच्या लेकीचा राष्ट्रीय स्तरावर डंका; पद्मश्री अहिरेला ‘मिस इंडिया’चा किताब!
पुण्यातील कॅलिस्टा इंडिया २०२६ फॅशन शोमध्ये १२ ते १५ वयोगटात यश; अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते सन्मान
धुळे (प्रतिनिधी) : धुळ्याची कन्या पद्मश्री पराग अहिरे हिने राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे येथे झालेल्या ‘कॅलिस्टा इंडिया २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो स्पर्धेत पद्मश्री हिने १२ ते १५ वयोगटात ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला. अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते किताब प्रदान करून तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
पद्मश्रीच्या या यशामुळे धुळे शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या सुमारे २० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये पद्मश्रीने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर अव्वल स्थान मिळवले.
क्लास नाही, ऑनलाइन व्हिडिओतून घेतले धडे!
पद्मश्रीने या यशासाठी कोणताही विशेष क्लास किंवा औपचारिक प्रशिक्षण घेतले नसल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन उपलब्ध व्हिडिओंच्या माध्यमातून फॅशन शो, रॅम्पवॉक आणि सादरीकरणाचे बारकावे आत्मसात करण्याचा प्रयत्न तिने केला. घरातून मिळालेले कलेचे संस्कार, आई-वडिलांसह बहिणीची साथ आणि स्वतःची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
“आता पुढचे लक्ष्य मिस इंडिया”
राष्ट्रीय स्तरावर लहान वयोगटात ‘मिस इंडिया’चा किताब मिळवल्यानंतर पद्मश्रीने आपल्या भविष्यातील ध्येयाबाबत उत्साह व्यक्त केला. “लहान वयोगटात मिस इंडिया झाले, आता पुढचे लक्ष्य मिस इंडिया हेच असेल,” अशी प्रतिक्रिया पद्मश्री पराग अहिरे हिने व्यक्त केली.
‘उडाण’ हिंदी चित्रपटात कामाची संधी
पद्मश्रीच्या या कलेची दखल घेत तिला ‘उडाण’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचे तिचे वडील बिल्डर पराग अहिरे यांनी सांगितले. या वयात मुलीने मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद असून, चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदित असल्याची भावना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पद्मश्रीच्या राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे धुळे शहरातील कला व फॅशन क्षेत्रातील नवोदितांना प्रेरणा मिळाली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
