टिटवी विद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाचा तालुक्यात डंका!
१४ वर्षांखालील मुलींच्या संघाची दमदार कामगिरी; अंतिम सामन्यात एन.ई.एस. गर्ल्स हायस्कूलवर मात
पारोळा प्रतिनिधी शिवम माळी : शासकीय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टिटवीच्या १४ वर्षांखालील मुलींच्या खो-खो संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. पारोळा येथील एन.ई.एस. गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली.
अंतिम सामन्यात टिटवी विद्यालयाच्या संघाचा सामना एन.ई.एस. गर्ल्स हायस्कूल, पारोळा संघाशी झाला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न करत चुरशीची लढत दिली. मात्र, टिटवीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, चपळता, वेग आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आणि तालुकास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयामुळे टिटवी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजेत्या संघातील खेळाडू तसेच क्रीडा शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
