Spread the love

काँग्रेसच्या आंदोलनाची तातडीने दखल; धुळे जिल्हा रुग्णालयातील CT Scan सेवा सुरू

अनेक महिन्यांपासून बंद असलेली सेवा पूर्ववत; गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा

धुळे : जिल्हा शासकीय रुग्णालय, धुळे येथील मागील काही महिन्यांपासून बंद असलेली CT Scan मशीनची सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या प्रश्नावर निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. सेवा पूर्ववत झाल्यामुळे सर्वसामान्य, गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील CT Scan सेवा बंद असल्याने गंभीर आजार, अपघात, डोक्याला झालेली दुखापत, अंतर्गत रक्तस्राव तसेच अन्य तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीत रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. CT Scan तपासणीसाठी रुग्णांना खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने अमीन अ. करीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. बंद असलेली CT Scan सेवा तातडीने सुरू करावी, सेवा बंद राहण्याची कारणे निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी, संबंधित कंपनीची देयके प्रलंबित असल्यास ती निकाली काढावीत आणि भविष्यात रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.

प्रशासनाची तातडीने कार्यवाही

काँग्रेसच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून CT Scan मशीनची सेवा पुन्हा सुरू केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक तपासणीची सुविधा पुन्हा उपलब्ध झाली आहे.

सेवा पूर्ववत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाचे आभार मानण्यात आले. तसेच या प्रश्नासाठी निवेदन देऊन पाठपुरावा करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाजबांधव आणि नागरिकांचेही काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले.

“सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक वैद्यकीय तपासणी उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. CT Scan सेवा सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे,” असे काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version