Spread the love

डॉक्टर-अधिकाऱ्यांच्या वापरासाठी किती खासगी वाहने? निविदा, ठेकेदार, भाडे व इंधन खर्चाची माहिती जाहीर करण्याची मागणी
YCMच्या भाडेतत्त्वावरील वाहनांचा खर्च किती? निविदा प्रक्रिया, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या वापराची माहिती मागितली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (YCM) इतर महापालिका रुग्णालये व वैद्यकीय विभागांसाठी खाजगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन वापरली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या वाहन व्यवस्थेच्या खर्चाबाबत आणि निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सार्वजनिक निधीतून या वाहनांवर होणाऱ्या खर्चाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी आणि आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी भाजपा कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

निवेदनात YCM रुग्णालय तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालये आणि वैद्यकीय विभागातील डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या वापरासाठी ठेकेदारामार्फत खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या वाहनांची नेमकी संख्या, त्यावरील खर्च, वाहनांचा वापर आणि संबंधित ठेकेदार याबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

किती खासगी वाहने? वापर कोणाचा?
निवेदनाद्वारे YCMसह महापालिकेच्या अन्य रुग्णालये आणि वैद्यकीय विभागासाठी सध्या किती खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत, याची माहिती मागण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाचा प्रकार, कंपनी, मॉडेल आणि वाहनांची संख्या स्वतंत्रपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच ही वाहने नेमक्या कोणत्या डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, अधिकारी किंवा विभागाच्या वापरासाठी देण्यात आली आहेत, याची विभागनिहाय माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा वापर कोणत्या कामासाठी आणि कोणत्या अधिकाऱ्यांकडून केला जातो, याबाबत स्पष्टता येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निविदा झाली की थेट वाहन व्यवस्था?
खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे किंवा नाही, याची अधिकृत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. निविदा काढण्यात आली असल्यास निविदा क्रमांक, दिनांक, अंदाजित किंमत, मंजूर किंमत तसेच निविदेतील अटी व शर्ती यांचा तपशील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आली का, पात्र ठेकेदारांची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली आणि महापालिकेच्या नियमांनुसार वाहन भाडेकरार करण्यात आला आहे का, याची माहितीही सार्वजनिक करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

L1 ठेकेदार कोण? कराराची माहितीही मागितली
सदर वाहन व्यवस्था ज्या ठेकेदार किंवा वाहतूकदारामार्फत करण्यात आली आहे, त्या L1 ठेकेदाराचे नाव, कराराची माहिती आणि संबंधित कामाला देण्यात आलेली मंजुरी याचा तपशीलही मागण्यात आला आहे.

याशिवाय प्रत्येक वाहनासाठी प्रतिदिन किंवा प्रतिमहिना किती भाडे अदा केले जाते, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहनांच्या भाड्याव्यतिरिक्त चालकाचा पगार, इंधन, वाहन देखभाल, दुरुस्ती तसेच इतर अनुषंगिक खर्च कोणाच्या जबाबदारीचा आहे, याचाही तपशील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सार्वजनिक निधी असल्याने पारदर्शकता आवश्यक
महापालिकेच्या रुग्णालयांशी संबंधित वाहन व्यवस्थेवर सार्वजनिक निधीतून खर्च होत असल्याने खर्चाचा प्रत्येक घटक स्पष्ट असणे आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. रुग्णालयीन सेवा, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांच्या सुविधांवर महापालिकेचा मोठा खर्च होत असताना वाहन भाडेव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारही नियमबद्ध आणि पारदर्शक असणे गरजेचे असल्याचे काळभोर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, निवेदनात कोणत्याही व्यक्ती किंवा ठेकेदारावर थेट गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला नसून, वाहनांची संख्या, वापर, निविदा प्रक्रिया, भाडे, करार आणि इतर खर्चाची अधिकृत माहिती उपलब्ध करून देत आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि YCMसह अन्य रुग्णालयांमध्ये भाडेतत्त्वावरील वाहनांवर नेमका किती खर्च होतो, याबाबतची अधिकृत माहिती कधी सार्वजनिक केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version