Spread the love

अक्राणी-बिलगाव वनविभागाची धडक कारवाई; सागवान लाकडासह बोलेरो पिकअप जप्त

३ लाख १२ हजार ६९४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात; अंधाराचा फायदा घेत संशयित जंगलात पसार

धडगाव : प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि बिलगाव वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बेकायदेशीर सागवान लाकडाची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. या कारवाईत सागवान लाकडासह एकूण ३ लाख १२ हजार ६९४ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. वनपथकाची चाहूल लागताच वाहन चालक व त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बिलगाव (प्रा.) आणि अक्राणी (प्रा.) वनक्षेत्रातील वनक्षेत्रपाल व रेंज स्टाफचे पथक पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास साव-या-भमाणा रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी एक संशयास्पद बोलेरो पिकअप (क्र. एमएच ३९ सी ६६३६) भरधाव वेगाने येताना पथकाच्या निदर्शनास आली.

शासकीय वाहन व वनकर्मचाऱ्यांची चाहूल लागताच चालकाने वाहन रस्त्यातच थांबवले. त्यानंतर अंधार आणि घनदाट जंगलाचा फायदा घेत चालक व त्याचे साथीदार वाहन सोडून जंगलात पसार झाले. वनपथकाने परिसरात शोधमोहीम राबविली; मात्र अंधारामुळे संशयितांचा ठावठिकाणा लागला नाही.

११४ नग सागवान चौकटी जप्त

पंचांसमक्ष आणि नियमानुसार वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान लाकूड आढळून आले. वाहनातून ११४ नग सागवान चौकटी, एकूण १३.६४५ घनमीटर, जप्त करण्यात आल्या. या लाकडाची किंमत ३७ हजार ६९४ रुपये, तर बोलेरो पिकअपची किंमत २ लाख ७५ हजार रुपये असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.

अशा प्रकारे लाकूड व वाहन असा एकूण ३ लाख १२ हजार ६९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले वाहन आणि सागवान लाकूड धडगाव टिंबर डेपो येथे ताबा पावतीने सुरक्षित जमा करण्यात आले आहे.

वनगुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणी साव-या येथील वनरक्षकांनी वनगुन्हा क्रमांक ०८/२०२६, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ अन्वये भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६(१) अ, फ, २६(१ए) ए, ४१(१), ४२ आणि ५२(१) नुसार वनगुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वनपाल भरतसिंग परदेशी करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई वनसंरक्षक, वनवृत्त धुळे निनु सोमराज, उपवनसंरक्षक नंदुरबार संतोष सस्ते, विभागीय दक्षता अधिकारी वनवृत्त धुळे राजेंद्र सदगिर आणि सहाय्यक वनसंरक्षक, अक्राणी रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोहिमेचे नेतृत्व बिलगाव (प्रा.)चे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे आणि अक्राणीचे वनक्षेत्रपाल रोहन पाटील यांनी केले. कारवाईत वनपाल भरतसिंग परदेशी, सिद्धार्थ बैसाणे, तसेच वनरक्षक पवन पाडवी, उमेश पावरा, अरविंद निकम, दिलवरसिंग पावरा, अमरसिंग पावरा, दिनेश वसावे आणि वाहनचालक हेमंत पावरा सहभागी झाले.

वनविभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर सागवान वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनपथकांची गस्त आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version