Spread the love

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची प्रागतिक विचारमंचने घेतली सदिच्छा भेट

जळगाव दौऱ्यात भुसावळ येथे विविध विषयांवर चर्चा; प्रागतिक विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भुसावळ : संघरत्न सपकाळे

महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश टी. वाघमारे शासकीय दौऱ्यानिमित्त जळगाव येथे आले असता, भुसावळ येथे प्रागतिक विचारमंचच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे किशोर मेढे यांचीही उपस्थिती होती. भेटीदरम्यान विविध सामाजिक, प्रशासकीय तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या वेळी प्रागतिक विचारमंचाचे प्रा. डॉ. जतीन मेढे, अध्यक्ष जे. पी. सपकाळे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर, राज्य पत्रकार संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे, साहित्यिक व लेखक अ. फ. भालेराव, देवेंद्र तायडे, समाधान जाधव, बच्छाव सर, प्रा. डॉ. सुनील नेवे, नागेश्वर साळवे, सुधाकर सनांसे आदी उपस्थित होते.

प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव

दिनेश टी. वाघमारे हे महाराष्ट्र केडरच्या १९९४च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असून, महाराष्ट्राचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी २८ जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर काम केले आहे.

वाघमारे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग; प्रधान सचिव, गृह (अपील व सुरक्षा) विभाग; प्रधान सचिव, ऊर्जा विभाग; अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL); प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग अशा पदांवर काम केले आहे.

तसेच त्यांनी महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळ (MAIDC); विभागीय आयुक्त, अमरावती; सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर; अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC); अध्यक्ष, नागपूर सुधार ट्रस्ट (NIT); जिल्हाधिकारी, बुलढाणा; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ व वाशिम; सहायक जिल्हाधिकारी, रत्नागिरी आदी पदांवरही काम केले आहे.

विविध पुरस्कारांनी सन्मान

प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिनेश वाघमारे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये ऊर्जा क्षेत्रातील स्कोच सुवर्ण पुरस्कार, नवभारत प्रशासन पुरस्कार, CSR India 2021 पुरस्कार, डिजिटल परिवर्तनासाठी PSU पुरस्कार, GreenTech Leading Director Award 2021 तसेच साक्षरोत्तर अभियानासाठी सत्येन मैत्रा राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे.

प्रागतिक विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी वाघमारे यांच्याशी झालेल्या या भेटीदरम्यान विविध सामाजिक व प्रशासकीय विषयांवर संवाद साधला. सदिच्छा भेटीमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version