ओमप्रकाश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त १४७ विद्यार्थ्यांना धान्य किटचे वाटप
एकल पालक कुटुंबांतील गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण; अग्रवाल परिवार व अनुलोम संस्थेचा सामाजिक उपक्रम
धुळे, ता. ९ : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील विविध वस्त्यांमधील अनाथ व एकल पालक कुटुंबांतील १४७ गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंसह धान्य किटचे वाटप करण्यात आले. भाजपच्या ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. ८) अग्रवाल परिवार आणि अनुलोम संस्थेच्या माध्यमातून, वस्तीमित्रांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांनी एकल पालक असलेल्या गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दैनंदिन गरजांसाठी आधार मिळावा आणि त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ७० विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जनसंपर्क कार्यालयात बोलावून अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते धान्य किटचे वितरण करण्यात आले. उर्वरित ७७ विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे धान्य किट सुपूर्द करण्यात आले. गरजू कुटुंबांपर्यंत थेट मदत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी अनुलोम मित्र दीपाली चौधरी, वैशाली गीते, दीपक भागवत, देवा कंढरे, रवी बोरसे, धुळे शहर भाग संवादिनी लीना महाले, धुळे शहर भाग जनसेवक किरण पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात
“ज्येष्ठ उद्योजक आणि आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ ओमप्रकाशजी अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली. शहरातील विविध भागांतील एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडी का होईना मदत व्हावी आणि त्यांचे जीवन सुकर व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंसह धान्य किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले समाधान आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले.”
— अल्पा अनुप अग्रवाल, प्रदेश प्रभारी, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ अभियान, भाजप
