Spread the love

पाणीटंचाईच्या नियोजनात हलगर्जी नको; एकमेकांवर जबाबदारी ढकलू नका!

आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; १ नोव्हेंबरपर्यंत गावनिहाय परिस्थितीचा अहवाल तयार करण्याचे आदेश

चोपडा, प्रतिनिधी – राहुल पाटील : जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना चोपडा तालुक्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पिण्याचे पाणी, टँकर नियोजन, शेतीसाठी पाणी, वीजपुरवठा आणि टंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

“पाणीटंचाईच्या काळात कोणत्याही गावाला किंवा वाडी-वस्तीला पाण्याअभावी अडचण निर्माण होता कामा नये. अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वयाने कामे पूर्ण करावीत,” अशा स्पष्ट सूचना आमदार सोनवणे यांनी प्रशासनाला दिल्या.

१ नोव्हेंबरपर्यंत गावनिहाय अहवाल तयार करा

तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि नागरिकांच्या गरजांची माहिती संकलित करावी. त्यानुसार १ नोव्हेंबरपर्यंत गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उपलब्ध पाणीसाठा आणि दररोजची पाण्याची गरज यांचा विचार करून काटेकोर नियोजन करावे. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी व समस्यांवर तातडीने तोडगा काढावा. पाणीटंचाई निवारणाच्या कामात कोणत्याही विभागाने दुसऱ्या विभागाकडे जबाबदारी ढकलू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टँकर नियोजनासह रखडलेल्या योजनांना गती

बैठकीत शहरासह तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठ्याची माहिती घेण्यात आली. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन, आवश्यक ठिकाणी टँकरची व्यवस्था आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पाणीटंचाई ही केवळ तात्पुरती समस्या समजून चालणार नाही. भविष्यातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजनांना गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

पावसाच्या खंडामुळे शेतीचे नुकसान; मदतीसाठी कार्यवाहीच्या सूचना

जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम शेतीसह अन्य क्षेत्रांवरही जाणवू लागला आहे. उन्हाळा सुरू होण्यास अद्याप कालावधी असतानाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

पावसाच्या खंडामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेऊन संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, अशा सूचनाही आमदार सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीला अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला नगराध्यक्ष नम्रता पाटील, मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब थोरात, तहसीलदार अंजली बर्गे, गटविकास अधिकारी दीपक साळुंखे, तालुका कृषी अधिकारी विवेक धांडे, नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी नांद्रे, उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता एस. व्ही. येवला, हतनूर येथील उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता क्षितिज चौधरी, गुळ प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राजेश मोरे, पाणीपुरवठा शाखा अभियंता कमलेश झाडे, जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता जितेंद्र मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना गती द्यावी आणि गावागावांतील पाणीप्रश्न वेळेत सोडवावेत, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version