Spread the love

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

परिवर्तन पॅनलचा सर्व १५ जागांवर विजय; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव

धरणगाव, प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील तळई येथील सद्गुरू गोविंद महाराज संस्थेच्या तळई माध्यमिक विद्यालयाचे नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविल्याने या निकालाची परिसरात चर्चा सुरू आहे.

संस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच पॅनलचे सर्व १५ उमेदवार विजयी

तळई माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक यंदा प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान झाले, तर ५ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत सभासद मतदारांनी परिवर्तन पॅनलला स्पष्ट कौल दिला. पॅनलने एकूण १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत संस्थेच्या निवडणूक इतिहासात नवा विक्रम नोंदविला.

या निवडणुकीत अध्यक्षपदी यशवंत खुशाल पाटील, उपाध्यक्षपदी मोहन राजाराम वाघ आणि सचिवपदी राजेंद्र वामन चौधरी यांची निवड झाली. तसेच संचालकपदी दीपक सुरेश पाटील, स्वप्निल भास्कर पाटील (सोनू पेंटर), वाल्मीक प्रकाश सोनवणे (लाला), वसंत बुधा चौधरी, विशाल इच्छाराम वाघ, पांडुरंग दत्तात्रय पाटील, गोपाल धनराज पाटील, प्रकाश नामदेव तामस्वरे, सत्यवान सुरेश पाटील, हेमराज श्रावण गायकवाड, दिलीप रामदास कंखरे आणि कैलास बळीराम पाटील यांची निवड झाली.

निवडणूक अधिकारी व त्यांच्या टीमचे कौतुक

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून निकाल जाहीर करण्यात आला. या कामाबद्दल निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सभासद व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निकालाची चर्चा

तळईमध्ये आगामी काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विद्यालयाच्या संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मिळविलेल्या निर्विवाद विजयाकडे स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे. या निकालातून गावात परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

मात्र, संस्थेच्या निवडणुकीतील निकालाचे प्रतिबिंब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसे उमटते, हे येणारा काळच स्पष्ट करेल. दरम्यान, सर्व १५ जागांवर विजय मिळविलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळासमोर संस्थेचा विकास, सभासदांच्या अपेक्षांची पूर्तता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे आव्हान असेल.

राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर महाले सर, एरंडोल उपतालुकाप्रमुख शिवदास पाटील, युवासेना तालुकाप्रमुख शुभम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष अजिज शेख सर, धरणगाव तालुका कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहित पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सचिव नंदूनाना धनगर, उपाध्यक्ष अमित शिंदे, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, शहराध्यक्ष जुनेद बागवान, संघटक प्रफुल्ल पवार तसेच तळई माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कारामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. आता नवीन संचालक मंडळ संस्थेच्या विकासासाठी कोणते निर्णय घेते, याकडे सभासद आणि तळईकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version