राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भानुदास विसावे यांची बिनविरोध निवड
शिर्डीतील राष्ट्रीय अधिवेशनात माजी मंत्री बबनराव घोलप यांची घोषणा; जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
पारोळा, सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भानुदास विसावे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा शिर्डी येथे आयोजित महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांनी ही अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर अधिवेशनस्थळी उपस्थित समाजबांधव आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात व घोषणांनी या निवडीचे स्वागत केले.
भानुदास विसावे यांनी यापूर्वी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा संघटनात्मक अनुभव, समाजातील विविध प्रश्नांची जाण आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे अधिवेशनात सांगण्यात आले.
राष्ट्रीय अधिवेशनाला मान्यवरांची उपस्थिती
शिर्डी येथे झालेल्या या अधिवेशनाला देशभरातून समाजबांधव, संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार अशोक माने, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पुरुषोत्तम राजगुरू आणि रमेश बुंदिले यांच्यासह विठ्ठलराव दांडगे सर, महिला राष्ट्रीय अध्यक्ष सरोज बिसुरे, राष्ट्रीय सचिव दत्ताराम गोतीसे, राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, शांताराम कारंडे, अनिल कानडे आणि नगरसेवक बापू ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प
अधिवेशनात महासंघाच्या आगामी वाटचालीसह समाजबांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर संघटनेचे कार्य अधिक व्यापक करणे, तरुणांना संघटित करून शिक्षण व रोजगाराच्या संधींशी जोडणे आणि चर्मकार समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे, या विषयांवर भर देण्यात आला.
भानुदास विसावे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव
भानुदास विसावे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पारोळ्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी आनंद व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर अहिरे, राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग बाविस्कर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका अंजलीताई विसावे, महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई बाविस्कर, युवक जिल्हाध्यक्ष दीपक अनुष्ठान, पारोळा तालुकाध्यक्ष दयाराम मोरे, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, रतिलाल मोरे, रवींद्र अहिरे, किरण पवार, किरण आठवले, पंकज खजुरे, संतोष वाघ, चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ, बाळासाहेब थोरात, युवक तालुकाध्यक्ष वाल्मीक महाले, देविदास बोरसे, चोपडा जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे, जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सुरवाडे, महानगराध्यक्ष भगवान बाविस्कर, अशोक धोरे आणि पाचोरा तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधवांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नव्या जबाबदारीतून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
