Spread the love

देशाचे रक्षण करायचे की घरासाठी न्याय मागत फिरायचे? जवानाचा उद्विग्न सवाल!

धुळ्यात सीमा सुरक्षा दलातील जवानाची घरबांधणीत फसवणूक झाल्याचा आरोप; निकृष्ट बांधकामामुळे भिंतींना तडे, कंत्राटदाराकडून टाळाटाळ केल्याचा दावा

पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा जवानाचा आरोप; संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे, प्रतिनिधी : देशाच्या सीमेवर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानालाच स्वतःच्या घराच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा प्रकार धुळ्यात समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेले जवान विनोद बोरसे यांनी घराच्या बांधकामात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे पडल्याने कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा, तसेच पोलिसांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप जवानाने केला आहे.

निकृष्ट बांधकामामुळे घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न

मिळालेल्या माहितीनुसार, फागणे येथील महेंद्र पाटील याच्यासह इतर संबंधित व्यक्तींनी सीमा सुरक्षा दलातील जवान विनोद बोरसे यांच्यासह अन्य जवानांची आणि आंबोडे येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची घरबांधकामाच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित घरांचे बांधकाम दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही काही काळातच बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे जवानांचे म्हणणे आहे. घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे पडल्याने घराच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे घराची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संबंधितांकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कंत्राटदाराच्या अरेरावीचा आरोप

घराच्या बांधकामातील त्रुटी दूर करून दुरुस्ती करावी, यासाठी जवान विनोद बोरसे यांनी संबंधित कंत्राटदाराकडे अनेकदा पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र, कंत्राटदाराकडून वारंवार टाळाटाळ केली जात असून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घरबांधणीसाठी मोठी रक्कम खर्च केल्यानंतरही घराच्या सुरक्षिततेची चिंता सतावत असल्याने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोलिसांकडे तक्रारी; कारवाईची मागणी

या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रार अर्ज देऊनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप जवान विनोद बोरसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात जवानांसह संबंधित शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. बांधकामाचा दर्जा, झालेली आर्थिक देवाणघेवाण आणि तक्रारींची वस्तुस्थिती तपासून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी पुढे आली आहे.

“देशाचे रक्षण करायचे की इकडे लक्ष द्यायचे?”

सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या घराच्या प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याने जवान विनोद बोरसे यांनी उद्विग्नता व्यक्त केली. “देशाचे रक्षण करायचे की इकडे लक्ष द्यायचे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.

देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवानाला स्वतःच्या घराच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासून जवानाला न्याय मिळणार का, तसेच पोलीस प्रशासन याप्रकरणी कोणती भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version