Spread the love

धडगावच्या वनगावांतील शेतकऱ्यांना दुष्काळी भरपाई द्या!

वनपट्टे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचेही पिकांचे नुकसान; बाधित गावांची संयुक्त पाहणी करून तातडीने मदत देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

धडगाव | प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील वनजमिनींवर वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या, मात्र अद्याप वनहक्क पट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही दुष्काळी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने वनपट्टे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे इतर बाधित शेतकऱ्यांप्रमाणेच या शेतकऱ्यांच्याही नुकसानीची पाहणी करून शासनाच्या नियमानुसार मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

७३ वनगावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर

धडगाव तालुक्यात एकूण ७३ वनगावे असून, या गावांमधील काही शेतकऱ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळाले आहेत; तर अनेक शेतकऱ्यांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत. वनपट्टे मिळालेले नसले, तरी हे शेतकरी अनेक वर्षांपासून संबंधित जमिनींवर प्रत्यक्ष शेती करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चालू हंगामात शेतकऱ्यांनी कर्जाऊ रक्कम उभारून बी-बियाणे, खते आणि शेतीच्या मशागतीवर खर्च केला. मात्र, पावसाअभावी पिके करपल्याने त्यांच्या हातात काहीच उरले नसल्याची परिस्थिती आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

संयुक्त पाहणी करून नुकसानभरपाई द्या

जमिनींच्या नोंदी आणि वनहक्क पट्ट्यांबाबतची प्रक्रिया प्रलंबित असली, तरी प्रत्यक्ष शेती व पीकपेरा झालेल्या जमिनींच्या नुकसानीची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वनपट्टे अद्याप मिळालेले नाहीत म्हणून बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे बाधित गावांची पाहणी करावी, प्रत्यक्ष पीकनुकसानीची पडताळणी करावी आणि पात्र शेतकऱ्यांना लागू असलेल्या शासकीय नियमांनुसार नुकसानभरपाई व दुष्काळी मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान

धडगाव तालुक्यातील सावऱ्यादिगर, भमाणा, उडद्या, खापरमाळ, भाबरी, सादरी, लेखडा, भरड, थुवानी, बोरसीसा दुठ्ठल, चिचखेडी, डोमखेडी, निमगव्हण, सुरुंग, तिनिसमाळ, कुकतार, आकवाणी, कुंभरी, नलगव्हाण, गोराडी, शेलगदा, पीपलचोप, शिक्का, गेंदा, बिलगाव, चिखली, बोरी, खर्डी खुर्द, निमखेडी, खुटवडा, शेलदा, बेडीपाडा, खडकला खुर्द, खडकला बुद्रुक, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, टेभुर्णी, बोदला, वावी, राजबर्डी, शेलकुवी, शिंदवाणी, तेलखेडी, कात्रा, निगदी, त्रिशूल, कुवरखेत, वेलखेडी, वलवाल, घाटली, धावलघाट, कामोद वसाहत, काकडदा, खांबला, सिरसाणी, बिजरी, काकारपाटी, उखळीआंबा, चाँदसैली, झुम्मट, मकतारझिरा, मोजरा, वाहवाणी, पौला, सिंधीदिगर, कुंड्या आणि फलई यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

जिल्हा परिषद सदस्य हारसिंग मल्या पावरा तसेच राज्या पावरा, सावऱ्या, ठाणसिंग पावरा, जामसिंग पावरा (सरपंच, बिलगाव), कालशा पावरा आणि दशरथ मालसिंग पावरा यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

वनपट्टे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमांनुसार मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि बाधित शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version